जो माझी भक्ती करतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय
अध्याय पाचवा
योगाभ्यास करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी हे मानवी जीवनाचं उद्दिष्ट असावं किंबहुना मनुष्य योनीत जन्म केवळ या एकाच कारणासाठी मिळालेला असतो असं म्हंटलं तरी चालेल. पण मनुष्यावर असलेल्या मायेच्या प्रभावामुळे हे उद्दिष्ट गाठणं सहजसाध्य नसतं. योगाभ्यास करत असताना अन्य गोष्टींचा मोह पडू शकतो. अशा परिस्थितीत योगाभ्यास मागं पडतो आणि आयुष्य संपून गेल्यामुळे तो अपूर्ण राहतो. असंच जर प्रत्येक जन्मात घडत गेलं तर तो पूर्ण कसा होणार ह्या प्रश्नावर बाप्पा पुढील श्लोकात सांगतात की, योगाभ्यास करणाऱ्या साधकाला सद्गतीच मिळते. त्याचा योगाभ्यास कधी वाया जात नाही. केलेला अभ्यास साधक कधी विसरत नाही. त्यामुळे मागील जन्मी जिथपर्यंत अभ्यास झाला असेल त्याच्यापुढील अभ्यास चालू होतो. अशा पद्धतीने त्याचा अभ्यास पूर्ण झाला की, त्याला मोक्षप्राप्ती होते.
पुनर्योगी भवत्येष संस्कारात्पूर्वकर्मजात् ।
न हि पुण्यकृतां कश्चिन्नरकं प्रतिपद्यते ।।26।।
अर्थ- पूर्वकर्मापासून उत्पन्न होणाऱ्या संस्कारामुळे तो पुन्हा योगी होतो. पुण्यकर्मी मनुष्यांपैकी कोणीही नरकात जात नाही.
विवरण- बाप्पा म्हणताहेत, राजा फार मोठ्या पुण्याईने मनुष्य योगी होतो. योगभ्रष्ट झाल्याने म्हणजे विषयभोगात गुंतल्यामुळं त्याचा अभ्यास खंडित झालेला असला तरी त्याच्या योगाभ्यासामुळे त्याने मोठा पुण्यसंचय केलेला असतो. त्यामुळे तो कधीही नरकात जात नाही. तसेच पुढील जन्मीही तो योगी होतो आणि त्याचा उर्वरित योगाभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
तेव्हा राजा, तुझ्या मनात असलेली भीती काढून टाक. योगाभ्यास अपूर्ण राहिला असला तरी पूर्वीच्या फार मोठ्या पुण्याईने तो योगी झालेला असतो. त्यामुळे योगभ्रष्ट जरी झाला, तरी त्याचे पुण्यबल कमी होत नाही. जीवनात काही काळ जरी त्याचं योगाभ्यासवरून लक्ष उडालं असलं तरी त्याचे अध:पतन होत नाही. म्हणजे मृत्यूनंतर त्याचा अभ्यास नाश पावत नाही. पूर्वजन्मी केलेली निष्काम सेवा, अनन्य भक्ती, उपासना, तपश्चर्या, साधना आणि योगाभ्यास यामुळे झालेले संस्कार शरीराचा नाश झाला तरी नाश पावत नाहीत. हे संस्कार बीज रूपाने सुप्तावस्थेत असतात. नव्या घरात, नव्या देहात अनुकूल परिस्थिती लाभल्याने हे सुप्त संस्कार पुन्हा चैतन्यशील होतात आणि पूर्वजन्मीच्या ज्ञान संस्काराशी त्यांचा बुद्धिसंयोग होतो. बाप्पा पुढील श्लोकात म्हणताहेत की, योगी श्रेष्ठ असतोच त्यात पुन्हा माझ्याठायी ज्याची भक्ती एकवटली आहे तो सर्वश्रेष्ठ ठरतो.
ज्ञाननिष्ठात्तपोनिष्ठात्कर्मनिष्ठान्नराधिप ।
श्रेष्ठो योगी श्रेष्ठतमो भक्तिमान्मयि तेषु यऽ ।।27।।
अर्थ- हे नराधिपा, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ व कर्मनिष्ठ यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे आणि योग्यांमध्ये माझ्या ठिकाणी जो माझी भक्ती करतो तो सर्वांत श्रेष्ठ ठरतो.
विवरण- बाप्पा म्हणताहेत तपस्वी, ज्ञानी आणि कर्मकांड करणारे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात श्रेष्ठ असले तरी त्यांची देहबुद्धी जागी असते. मी कर्ता आहे ही भावना ठाम असते. त्यामुळे तप, ज्ञानार्जन आणि कर्म हे सगळं करण्यातून त्यांना उद्धाराची अपेक्षा असते. परंतु योगी निरपेक्षतेनं साधना करत असल्यामुळे तो स्वत:च ईश्वरस्वरूप झालेला असतो. त्याला कसलीच अपेक्षा नसते. त्याचा देह ईश्वराच्या मर्जीनुसार चालत आहे अशी त्याची ठाम धारणा असते. त्यामुळे तो तप, ज्ञानार्जन आणि कर्मकांड करणाऱ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. त्यातही जो माझी भक्ती करतो तो सर्वश्रेष्ठ योगी असतो कारण माझी भक्ती करणारा सुरवातीपासून अहंकारविरहित असतो.
श्रीगणेशगीता अध्याय पाचवा समाप्त