For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो माझ्यात सर्वांना पाहतो तो माझ्यात केव्हाच विरघळून गेलेला असतो

06:30 AM Jun 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
जो माझ्यात सर्वांना पाहतो तो माझ्यात केव्हाच विरघळून गेलेला असतो
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले, स्थिर मनाने योगाभ्यास केल्यावर मनाला उत्तम शांती मिळते. त्यामुळे ते आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन आत्मरूप बनून जाते. मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी दोषविरहित होतो व सुखाने ब्रह्मसाक्षात्काररूपी कधीही न संपणारे, आत्यंतिक सुख भोगतो. प्रापंचिक माणसाला मोहमायेने ग्रस्त असलेल्या संसाराची फार आवड असल्याने त्याच्यासाठी योगमार्गाची वाटचाल बिकट असते. त्यामुळे त्याला योगमार्गाचे आचरण करणे शक्य होत नाही परंतु त्याचाही उद्धार व्हावा, त्यानेही ब्रह्मस्वरूप व्हावे ह्या उद्देशाने भगवंत आणखी एक मार्ग सांगत आहेत. पुढील श्लोकात भगवंत त्या दुसऱ्या मार्गाबद्दल बोलताना म्हणाले, जो मी सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी आहे व माझ्या ठिकाणी प्राणिमात्र आहेत असे पाहतो. तो योगयुक्त होऊन सर्व ठिकाणी समदृष्टीने पाहू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही कायमचे एकमेकांचे होऊन राहतो.

भूतात भरला आत्मा भुते आत्म्यात राहिली । योगाने जोडीला देखे हे चि सर्वत्र दर्शन ।।29 ।।

Advertisement

मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्वहि। त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय ।।30।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, ते सर्व देहांमध्ये आहेत आणि त्यांच्यात सर्वांचा समावेश आहे हे जर मनावर बिंबले तर आम्ही दोघे एकमेकांना कायम दिसत असतो. मी सर्व भूतात आहे असे जाणून तो मला भजतो. त्याला समोर दिसणारे सर्व प्राणी वेगवेगळे न दिसता, सर्वत्र माझेच दर्शन होत असते.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, मी एकट्यानेच सर्व विश्व व्यापलेले आहे हे ज्याच्या लक्षात येते तो जरी नामरूपाने माझ्यापेक्षा वेगळा असला तरी मत्स्वरूप झालेला असतो.

स्थिर होऊनी एकत्वी सर्व भूती भजे मज । राहो कसाही तो योगी माझ्यामध्येच राहतो ।।31।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जो माझ्यात सर्वांना पाहतो तो माझ्यात केव्हाच विरघळून गेलेला असतो. ह्या प्रत्यक्ष अनुभवायच्या गोष्टी आहेत. दिव्याची ज्योत व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने राहतो. जेथपर्यंत पाणी आहे, तेथपर्यंत असलेला ओलावा पाण्याशी एकरूप झालेला असतो त्याप्रमाणे तो आणि मी एकरूप झालेले असतो. ज्याप्रमाणे एकाच प्रकारच्या धाग्याने वस्त्र तयार होते, त्याप्रमाणे ईश्वरी तत्वानेच हे सर्व जग तयार झाले आहे. जरी दागिने निरनिराळ्या आकाराचे असले तरी ते सोन्यापासूनच तयार झालेले असतात. अशा विचारातून ज्याने माझ्याशी एकरूपता साधलेली आहे तो शरीरधारी जरी असला तरी शरीरात अडकून पडत नाही. असा योगी, भक्त विठ्ठलमय झालेला असतो असे नामदेव महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात. अशा मंडळींना मरणोत्तर मिळणाऱ्या मुक्तीची फिकीर नसते. त्यामुळे ते काळालाही भीत नाहीत. नामदेव महाराज ह्या लोकांची मानसिकता त्यांच्या अभंगातून मांडताना म्हणतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ।।1।। माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ।।2।। गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ।।3।।नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणुनि कळिकाळा पाड नाही ।।4।।

Advertisement
Tags :

.