महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाप्पांचे दिव्य जन्म जो जाणतो त्याचा उध्दार होतो

06:30 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

अधर्माचा उत्कर्ष व धर्माचा अपकर्ष जेव्हा होतो तेव्हा साधूचे संरक्षण करण्याकरिता आणि दुष्टांना शासन करण्याकरिता बाप्पा अवतार घेतात. जेव्हा मनुष्याच्या अपेक्षा वाढू लागतात तेंव्हा त्याच्या हातून निषिद्ध आचरण आदि गोष्टी घडू लागतात. या सगळ्याचा निष्काम कर्म करणाऱ्या संत महात्म्यांना शारीरिक, मानसिक त्रास होऊ लागतो. अशा वेळेस होणारा अधर्म, त्यातून होणारा अन्याय आणि पाप नष्ट करण्यासाठी ईश्वरी अवतार होतो. ईश्वराचे अवतार अवरोहात्मक व आरोहात्मक अशा दोन स्वरूपाचे असतात. पहिल्या अवरोहात्मक स्वरूपात ईश्वर स्वत: मनुष्यदेह धारण करतात तर दुसऱ्या स्वरूपात ज्या मनुष्याची ईश्वरस्वरूपात उक्रांती झालेली असते, तो ईश्वरी अवतार भासू लागतो. अवताराच्या पहिल्या प्रकारात ते स्वत: सगुणरूप धारण करतात जसे राम, कृष्ण इत्यादि. दुसऱ्या प्रकारात मनुष्यरूपातील व्यक्ती ईश्वरस्वरूप होऊन वावरत असते. तपोबळावर ती एव्हढी उन्नत होते की, तिला ईश्वराचे सर्व अधिकार प्राप्त होतात आणि ती व्यक्ती जीवनकाळात लोककल्याणकारी कार्य करत राहते. त्यासाठी आवश्यक त्या लिलाही ती दाखवते. दुष्टांचा नायनाट करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ईश्वर सगुणरूप धारण करतात तर लोककल्याणकारी कार्यासाठी व त्यातून लोकोध्दार साधण्यासाठी ते येथील मनुष्याची योजना करतात. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, रामदास स्वामी इत्यादि. बाप्पा म्हणाले, अधर्मसंग्रहाचा उच्छेद करून मी धर्माची संस्थापना करतो. नानाप्रकारच्या लीला करून हंसत खेळत दुष्टांचा व दैत्यांचा संहार करतो. ह्या आशयाचा उच्छिद्याधर्मनिचयं धर्मं संस्थापयामि च । हन्मि दुष्टांश्च दैत्यांश्च नानालीलाकरो मुदा  ।।11 ।। श्लोक आपण अभ्यासत आहोत.

Advertisement

समाजात सर्व व्यवस्थित चाललेले काही समाजकंटकांना बघवत नाही. म्हणून ते धर्माच्या विरुद्ध अधर्माचरण करतात. त्याचा सर्वसामान्य माणसांना फार त्रास होतो पण ते निमूटपणे तो सहन करत असतात व दु:ख सोसत राहतात. साधुसंत सोशिक असल्याने कितीही त्रास झाला तरी ते धर्माचरण करायचे सोडत नाहीत. भक्त प्रल्हाद जरी राक्षस कुळात जन्मले असले तरी नारायणाचे महान भक्त होते. त्यांना त्यांच्या अधर्माचरण करणाऱ्या राक्षस पित्याने, हिरण्यकश्यपूने किती त्रास दिला हे सर्वांना माहित आहे. तरी प्रल्हादानी नारायणाचे नाव घ्यायचे सोडले नाही. ते सतत भज मन, नारायण नारायण हरि हरि, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हे भजन म्हणत असत. त्यांना होणारा त्रास असह्य होऊन ईश्वराने ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला दिलेल्या वराचे पालन करण्यासाठी महाभयंकर असा नृसिंहअवतार धारण केला. हिरण्यकश्यपूला ठार मारून धर्माची पुनर्स्थापना केली व प्रल्हादाबरोबर समस्त प्रजेला तोषवले. कृष्णावतारात तर ईश्वरांनी केलेल्या लीला प्रसिद्धच आहेत. त्या अवतारात त्यांनी किती दुष्टांचा संहार केला आणि किती भक्तांचा उद्धार केला त्याला गणतीच नाही. रामावतारातही तसेच घडले.

पुढील श्लोकात बाप्पा म्हणतात, अवतारकाळात मी सर्व नीतीनियमांचे पालन करतो. असे माझे दिव्य जन्म जो जाणतो त्याचा उद्धार होतो.

वर्णाश्रमान्मुनीन्साधून्पालये बहुरूपधृक् ।

एवं यो वेत्ति संभूतीर्मम दिव्या युगे युगे ।। 12 ।।

तत्तत्कर्म च वीर्यं च मम रूपं समासत ।

त्यक्ताहंममताबुद्धिं न पुनर्भू स जायते ।।13।।

अर्थ- बहुत रूपे धारण करणारा होऊन मी वर्ण, आश्रम मुनि व साधु यांचे पालन करतो. याप्रकारे युगायुगाचे ठिकाणी होणारे माझे दिव्य जन्म जो जाणतो, माझी ती ती कर्मे, पराक्रम, सर्व प्रकारे माझे स्वरूप जाणतो, तो अहंकार आणि ममत्वबुद्धि यांचा त्याग करून पुन्हा जन्म पावत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media