For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो भक्तिहीन, श्रद्धाहीन व संशयी असतो त्याचे कल्याण होत नाही

06:20 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
जो भक्तिहीन  श्रद्धाहीन व संशयी असतो त्याचे कल्याण होत नाही
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, भक्तिमान, इंद्रिये जिंकलेल्या व ज्ञानतत्पर मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होते. ते मिळविल्यानंतर तो मोक्षस्थिती अनुभवतो. ईश्वराची भक्ती करणाऱ्या जितेंद्रिय साधकाला आत्मज्ञान मिळवण्याची तळमळ लागलेली असते. त्याला सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व जाणवत असते. अखंड नामस्मरणाने ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे ही जाणीव सदैव जागृत राहते हे प्रल्हादाने दाखवून दिले. ही जाणीव जागृत असलेला भक्त ईश्वरापासून वेगळा राहूच शकत नाही. त्याचं स्वत:चं अस्तित्व त्यानं ईश्वरात केव्हाच विलीन करून टाकलेलं असतं. त्याला सतत ईश्वर आपल्याबरोबर आहे ह्याची अनुभूती येत असते. अर्थात आपल्यासारख्या सामान्य माणसालाही ईश्वर आपल्याला सावरून घेत आहे ह्याची अनुभूती येत असते पण ते आपण सहजी मान्य करत नाही कारण आपण स्वत:ला कर्तृत्ववान समजत असतो. संपूर्ण ईश्वरावर अवलंबून असलेल्या भक्ताच्या स्वत:च्या अशा कोणत्याच इच्छा शिल्लक रहात नाहीत. त्यामुळे इंद्रियांच्या हट्टाग्रहाचे त्याच्यापुढे काहीच चालत नाही. त्यांच्यावर मिळवलेल्या विजयामुळे ती त्याला शरण आलेली असतात. अशी अवस्था आली की, साधकात आत्मज्ञान प्रकट होते व तो सिद्ध होतो. याउलट मी कर्ता आहे ह्या समजुतीने जे वागतात त्यांचे ह्या लोकातच कल्याण होत नाही मग परलोकात त्यांचे भले व्हायचे नावच नको असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

भक्तिहीनोऽ श्रद्दधान: सर्वत्र संशयी तु य: ।

Advertisement

तस्य शं नापि विज्ञानमिह लोकाऽथ वा पर: ।। 48 ।।

अर्थ- जो भक्तिहीन, श्रद्धाहीन व सर्वत्र संशयी असतो त्याचे कल्याण होत नाही, त्याला ज्ञान मिळत नाही, त्याला इहलोक नाही अथवा परलोक नाही.

विवरण- मनुष्याचा स्वभाव सत्व, रज आणि तम ह्या गुणांनी बनलेला असतो. त्यामध्ये कुठल्यातरी एका गुणाचे प्राबल्य असते. सत्व गुण जास्ती असलेला सात्विक माणूस ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करत असतो आणि त्याला अनुरूप अशी त्याची वर्तणूक असते. तो हळूहळू एक एक पायरी चढत चढत आत्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक ती पात्रता मिळवतो व ईश्वराच्या कृपेनं मोक्षपदी आरूढ होतो आणि आयुष्यमान संपले की, ईश्वरात विलीन होतो.

रजोगुणी माणसाला फक्त स्वत:चा स्वार्थ कळत असल्याने त्याला चांगले काय, वाईट काय हेच कळत नसते. तो सदोदित काही ना काही मिळवण्याच्या मागे असतो व त्यातच त्याचे आयुष्य संपून जात असल्याने त्याला ईश्वरभक्ती करायला वेळच मिळत नाही.

तमोगुणी मनुष्य कायम स्वत:च्या देहाशिवाय इतर कशाचेच अस्तित्व मान्य करत नसल्याने ईश्वर अस्तित्वात नाही अशी त्याची ठाम समजूत असते. जीवन हे केवळ सुखोपभोग घेण्यासाठी असून ते मिळवण्यासाठी त्याची कायम धडपड चालू असते. म्हणून बाप्पा म्हणतात रजोगुणी व तमोगुणी माणसं भक्तीहीन व श्रध्दाहीन असल्याने ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल संशयी असतात आणि संशयी मनुष्याचा कायम विनाश होतो. त्याला धड इथं सुख मिळत नाही व परलोकातही तो सुखी राहू शकत नाही. संशयात्मा विनश्यति असं भगवंत भगवदगीतेतही सांगतात.

ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन माणसाने पूर्वकर्मानुसार जसा स्वभाव मिळाला असेल त्याचा स्वीकार करावा आणि संतसंगती आणि देवभक्ती करून त्याच्या स्वभावातल्या सत्वगुणाची वाढ करावी म्हणजे त्याचा स्वभाव संशयरहित होऊन त्यांची आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. आपण कर्ते नाही आणि समोर दिसणारी दुनिया मिथ्या आहे ह्याची खात्री पटलेल्या सिद्ध पुरुषाचा संशय पूर्णपणे  फिटलेला असल्याने त्याला कर्मे बंधनकारक ठरत नाहीत असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.