For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वधर्माचे आचरण जो करत नाही तो पापांच्या राशी रचत असतो

06:48 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वधर्माचे आचरण जो करत नाही  तो पापांच्या राशी रचत असतो
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

ब्रह्मदेवानी अन्नसाखळी कशी काम करते ते सांगितले. ते म्हणाले, अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे. कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे. वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्ठीत असतो. ब्रह्मदेवांच्या सांगण्यावर पुढे बोलताना भगवंत म्हणाले, अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या त्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, तो विषयांच्या ठिकाणी रममाण होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवितो. आपल्याला मिळालेले शरीर पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे त्याला जोडून कर्तव्यकर्मही येतेच हे लक्षात घेऊन ते करण्याची टाळाटाळ करू नये.

अन्नसाखळी तोडण्याचा जो प्रयत्न करेल त्याला इशारा देताना भगवंत म्हणाले, हे अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. तो विषयांच्या ठिकाणी रममाण होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवितो.

Advertisement

प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी । इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी ।। 16 ।।

भगवंत अर्जुनाला स्वधर्म निभावण्याचे महत्त्व समजावून सांगत आहेत. मनुष्य जीवनात स्वधर्म निभावण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रत्येकाने करायचा यज्ञ म्हणजे स्वधर्म निभावणे. यज्ञात अग्निला समिधा अर्पण करतात त्याप्रमाणे स्वकष्टाने एखादे कार्य करून ते देवाला अर्पण करणे हे यज्ञ केल्यासारखेच आहे. असे करत असताना त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी भगवंतानी घेतली आहे आणि त्यासाठी त्यांनी अन्नसाखळी तयार केलेली आहे.

आपण सध्या अभ्यासत असलेल्या श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, हे धनुर्धरा! याप्रमाणे ही कार्यकारण परंपरा तुला स्वधर्माचा यज्ञ कळण्याकरता संक्षेपाने सांगितली. जो उन्मत्त मनुष्य या लोकांमध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण न करता, वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियांचे लाड पुरवितो, तो केवळ पापांच्या राशी रचत असून भूमीला केवळ भार आहे असे समज. आकाशात फिरणारे पांढरे ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे हे अर्जुना! पापांच्या राशी रचणाऱ्या मनुष्याचा जन्म व त्याने केलेले कर्म निष्फळ ठरते. आपला उद्धार व्हावा ह्या भावनेतून, ज्याच्या हातून स्वधर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून स्वधर्म कोणीही सोडू नये. नुसते मी स्वधर्माचे आचरण करीन असे म्हणत राहिल्यास काहीच घडत नाही हे लक्षात घेऊन काया, वाचा, मनाने स्वधर्माचे आचरण करायला सुरवात करावी. आपल्याला मिळालेले शरीर पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे त्याला जोडून कर्तव्यकर्मही आलेच हे लक्षात घेऊन ते करण्याची टाळाटाळ करू नये. म्हणून जे लोक शारीरिक कष्ट होतील किंवा द्रव्य खर्च होईल ह्या विचारांनी अथवा आळस दाटून आल्याने कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते लोक फक्त स्वत:पुरते पाहणारे असतात.

जो मनुष्य निरपेक्षपणे, स्वधर्माचे आचरण काया, वाचा, मनाने करत राहील तो आपोआपच संपूर्ण निस्वार्थी होईल. अशा निस्वार्थी मनुष्याला कुणाकडून कशाचीही अपेक्षा नसते. त्यामुळे करत असलेल्या कर्माच्या फळाचा त्याग करणे हे त्याला डाव्या हाताचा मळ काढण्याप्रमाणे सोपे असते. हे सर्व घडून आल्याने त्याला आत्मस्वरूपाची ओळख होणार हे नक्कीच आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.