For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा दृढ निग्रह जो करत नाही त्याचे मन भरकटते

06:41 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा दृढ निग्रह जो करत नाही त्याचे मन भरकटते
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, आत्मज्ञानाने परिपूर्ण अवस्थेला पावलेला पुरूष विषयात गुंतून पडत नाही. विषयांचे आकर्षण वाटून त्याच्या मनाची चलबिचल होत नाही. तो विश्वचैतन्याशी एकरूप होऊन राहिल्याने त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. त्याचे चित्त प्रसन्न असते.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, जे साधना करीत नाहीत, त्यांच्या अंत:करणात सद्बुद्धी नसते, आस्तिकभाव नसतो अशा पुरुषाला शांती नसते. त्यामुळे त्याला सुख तरी कोठून मिळणार?

Advertisement

अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे । म्हणूनी न मिळे शांती शांतीविण कसे सुख ।। 66 ।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, जो ईश्वराच्या अनुसंधानात रहात नाही, त्याला विषय जखडून टाकतात. विषयांचा उपभोग घेण्याच्या इच्छेने तो कायम अस्थिर असल्याने स्थिरपणाची नुसती भावनाही ज्याच्या मनाला शिवत नाही, त्याला शांतीचा लाभ कसा होणार? जसे पापी मनुष्याकडे मोक्ष चुकूनदेखील पाहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये शांती नाही, तेथे सुख नजरचुकीने सुद्धा प्रवेश करत नाही.

एखादी अशक्य गोष्ट घडली तरच अस्थिर बुद्धीच्या माणसाला सुखाची प्राप्ती होईल हे सांगताना माउली म्हणतात, जर भाजलेल्या धान्याच्या बी ला अंकुर फुटले तरच हृदयात शांती नसलेल्या मनुष्यास सुखप्राप्ती होऊ शकेल. म्हणूनच मनाचे चंचलपण हेच सर्वतोपरी दु:खाचे कारण आहे. ह्या करीता साधकाने इंद्रियांनी दाखवलेल्या किंवा सुचवलेल्या विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे.

विषयांकडे दुर्लक्ष करण्याचा दृढ निग्रह जो करत नाही त्यांची अवस्था कशी होते ते सांगताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, ज्याचे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या मागे धावत राहते, ते मन पाण्यातील नावेला वारा ज्याप्रमाणे भलतीकडे घेऊन जातो, त्याप्रमाणे मानवाच्या बुद्धीला वेगळ्याच मार्गाकडे घेऊन जाते.

इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे । त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी ।। 67 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, जयांचा इंद्रियांवर ताबा नसतो ते इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांच्यामागे धावत असतात. त्यांना आपण विषयरूपी सागरातून तरलो आहोत, असे वाटते पण तो त्यांचा गैरसमज असतो. बहुतेक माणसे इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांना बळी पडत असल्याने ती ह्या संसार सागरात वारंवार बुडत असतात. विशेष म्हणजे अज्ञानी माणसेच असे वागतात असे नाही तर आत्मज्ञान झालेला मनुष्यही इंद्रियांनी दाखवलेल्या विषयोपभोगांच्या आकर्षणाला बळी पडून, स्वत:चे नुकसान करून घेतो, एव्हढा इंद्रियांचा माणसाच्या मनावर जबरदस्त पगडा असतो. त्यामुळे इंद्रिये दांड्गीची की असं इंद्रियांचे वैशिष्ट्या माऊली सांगतात. ह्यासाठी माउली असा दृष्टांत देतात की, जर एखादी नाव तीराजवळ आली की, ती सुरक्षित मानली जाते पण त्याचवेळी प्रचंड वादळ उत्पन्न झाले तर ज्या संकटांशी झगडून ती तीरापर्यंत आलेली असते त्याच संकटात ती पुन्हा सापडते. त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या ज्ञानसंपन्न पुरूष कैवल्यसाक्षात्कार होऊन मुक्तीच्या जवळ आलेला असतो. त्याने गंमत म्हणून क्वचित कधी इंद्रियांचे लाड केले तर तो पुन्हा संसार दु:खाच्या चक्रात सापडतो. ह्यावरून इंद्रियांची अफाट ताकद आपण लक्षात घ्यावी अशी माउलींची इच्छा आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.