जो कर्मफळाच्या अपेक्षेने कर्म करतो तो बंधनात अडकतो
अध्याय पाचवा
माउली म्हणतात, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले कर्म निष्कर्म होते. ही मर्माची गोष्ट सदगुरू आपल्या गळी उतरवतात. त्यासाठी आवश्यक असलेली चित्तशुद्धी सद्गुरू सेवा पूर्ण झाली की, होते. आत्ता हे जे मी सांगतोय ते मनुष्य जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हाच संगतवार सांगता येते. त्यावेळी त्याच्या मनात शांतरसाचा पूर आलेला असल्याने तो मर्यादा सोडून उचंबळत असतो. त्यामुळे बोलण्याच्या पलीकडील गोष्ट सांगता येते.
माउली असाच शांतरसाचा पूर अनुभवत असल्याने त्यांनी कर्मयोग्याच्या कार्यपद्धतीवर सविस्तर विवेचन केले.
ते पुढे म्हणाले, आपण कर्ते नसल्याने आपली इंद्रिये पराधीन असतात हे आपण नीट समजून घेत नाही. आपण आजारी पडलो, अंथरुणावर झोपून असलो की, हे मान्य करावे लागते कारण आपल्या मनाप्रमाणे आपण इंद्रियांच्या हालचाली करू शकत नाही पण बरे झाल्यावर आपल्याला त्याचा विसर पडतो. त्यामुळे सर्व इंद्रिये आपल्या हुकुमानुसार वागतायत असे आपल्याला वाटू लागते. अशा माणसाला कर्मयोगी कशा पद्धतीने काम करतो हे समजणार नाही परंतु ज्याने साधना करून इंद्रियांना आपल्या अंकित करून घेतलेले असल्याने जो देवाचेच रूप झालेला असतो त्याला मी काय म्हणतोय ते लगेच समजेल. स्वत: कर्मयोगी झाल्याशिवाय कोणताही लेप न लागता कर्मयोगी कर्म कसे करत असतो ते कळणार नाही असे माउलीना सांगावयाचे आहे. माउली ज्ञानेश्वरी सांगत असताना पुढे बसलेले जाणकार श्रोते म्हणाले, जे मनाने आकलन करणे कठिण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. आता तू श्रीकृष्ण संवादाची पुढील कथा सांग.
त्यानुसार माऊली पुढे सांगू लागले. ते म्हणाले, पुढील श्लोकात भगवंत आत्तापर्यंत सांगितलेलेच पुन्हा एकदा सांगून त्यांचे म्हणणे अर्जुनाच्या आणि आपल्या आचरणात कसे येईल ह्याची काळजी घेत आहेत. भगवंत म्हणाले, मी कर्ता आहे हा अहंकार आणि केलेल्या कर्माच्या फळात जीव अडकणे ह्या दोन गोष्टी टाळल्यास कर्मफलाचा त्याग करणे सहजी शक्य होते. त्यातून त्या कर्मयोग्याला अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मिळते. जो कर्मयोगाचे आचरण करत नाही तो फळाच्या अपेक्षेने कर्म करत असल्याने बंधनात अडकतो.
युक्त तो फळ सोडूनि शांति निश्चळ पावतो । अयुक्त स्वैर-वृत्तीने फळी आसक्त बांधिला ।। 12 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सद्गुरुंनी सांगितलेला उपदेश पूर्णपणे तंतोतंत अमलात आणणारा शिष्य कृतकृत्य होतो. भगवंत अर्जुनाला म्हणाले, कृतकृत्य शिष्य आत्मज्ञान मिळाले असल्याने संपन्न झालेला असतो. त्यामुळे त्याला कर्मफलाचा वीट आलेला असतो, शांती त्याला वरते. ह्याउलट वर्तन जो करतो तो कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सर्व कर्मांचा मनाने संन्यास केलेला संयमी पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने रहात असतो.
मनाने सगळी कर्मे सोडुनी संयमी सुखे । नव-द्वार-पुरी राहे करी ना करवी हि ना ।। 13।।
माउली म्हणतात, संयमी पुरुष फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या खात्रीने त्याविषयी उदासीन राहतो.