For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जो निरपेक्षतेने कर्म करतो तो खरा संन्यासी होय

06:30 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
जो निरपेक्षतेने कर्म करतो तो खरा संन्यासी होय
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

शब्दांचे सामर्थ्य काय असते, आत्मज्ञानाचे आकलन होण्याचा अधिकारी कोण व सद्गुरुकृपेने ते मिळाल्यावर, त्यांच्याच कृपेने त्याचे इंद्रियांना दिसणारे सगुण रूप मी साकार करणार आहे असे सांगून झाल्यावर माउली आता सहाव्या अध्यायाच्या निरुपणाला सुरवात करत आहेत. पहिल्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्मफलाची अपेक्षा न ठेवता, जो कर्तव्य म्हणून कर्म करतो, तोच खरा संन्यासी व तोच योगी होय. कर्माचा त्याग करून स्वस्थ बसणाऱ्या माणसाला संन्यासी अथवा योगी म्हणता येत नाही.

फळी आश्रय सोडूनि करी कर्तव्य कर्म जो । तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निक्रिय ।।1।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली प्रथम भगवंताचे वैशिष्ट्या सांगताना म्हणतात, कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा उच्चप्रतीचे गुण भगवंतांमध्ये असतात. ते अर्जुनाला म्हणाले, निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच म्हणायचे. जरी त्यांना संन्यासी आणि योगी अशी दोन वेगळी नावे असल्याने कदाचित तुला त्यांच्यात फरक आहे असे वाटेल. ज्याने कर्मफलाचा त्याग आपणहूनच केलेला असतो तो आचरत असलेला कर्मयोग म्हणजेच संन्यासयोग होय. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषाला लोक ओळखतात. कुणी दादा म्हणतं, कुणी मामा म्हणतं, कुणी बाबा म्हणतं पण ती एकच व्यक्ती आत्मीयतेने त्याकडे लक्ष देऊन सगळ्यांना ओ म्हणत असते किंवा पाणी वेगवेगळ्या भांड्यातून भरले असता वेगवेगळ्या आकाराचे दिसते पण ते एकच असते. त्याप्रमाणे योग व संन्यास ह्यांचा वेगवेगळेपणा फक्त वरून दिसण्यापुरता आहे. जो कर्माचे आचरण करून फळाची अपेक्षा करत नाही, तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय.

खरा संन्यासी कोण हे समजावून सांगताना माऊली पृथ्वीचे उदाहरण देऊन म्हणतात, पृथ्वी अहंकारावाचून म्हणजे स्वत:ला कर्ता न समजता वृक्षादिकांना सहजी जन्म देते आणि त्यांना येणाऱ्या फळाची अपेक्षा करत नाही त्याप्रमाणे जो कुटुंबातील वहिवाटीप्रमाणे करावी लागणारी कामे स्वत:ला कर्ता न समजता वेळच्यावेळी आणि रीतसर करतो आणि त्यापासून मिळणाऱ्या फळाची इच्छा करत नाही तोच खरा योगीराज असून संन्यासी होय.

सर्वसामान्य माणसांची अशी समजूत असते की, अंगावर पडलेले काम टाळण्यासाठी मनुष्य संन्यास घेतो. अशा पद्धतीने नावडते कर्म टाळले की लागलीच तो दुसरे आवडते कर्म करण्यास सुरवात करतो. ह्याप्रमाणे कर्माचा दास झाल्याने तो व्यर्थच कष्ट उपसत असतो. डोक्यावर असलेले गृहस्थाश्रमाचे ओझे टळावे म्हणून तो संन्यास घेतो पण झोपडीची काळजी करतो. कर्मयोग आणि संन्यास ह्यातील मर्म नीट न समजून घेतल्याने ना धड गृहस्थाश्रम ना धड संन्यास अशी त्याची अवस्था होते. हे लक्षात घेऊन दैनंदिन तसेच प्रसंगानुसार कर्मे निरपेक्षतेने करावीत म्हणजे सुख आपणहून चालत येते. ह्याबद्दल अधिक सांगताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, अर्जुना, कर्मफळाचा त्याग करणारा संन्यासी ईश्वराशी जोडला जातो. जो ह्याप्रमाणे वागतो तो संन्यासयोग साधून योगी होतो. ह्याचाच अर्थ असा की, ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा मनुष्य योगी होऊ शकत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.