For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Man Taluka | शेळीला वाचवायला गेला अन् घडला हृदयद्रावक अंत; माण तालुका हादरला

02:08 PM Jun 25, 2026 IST | NEETA POTDAR
man taluka   शेळीला वाचवायला गेला अन् घडला हृदयद्रावक अंत  माण तालुका हादरला
Advertisement

माण -माण तालुक्यातील मार्डी गावात माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाचा आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आजीचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

मार्डी गावातील काळेवस्ती परिसरात आज दुपारी दीडच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. सौ. मालन विलास काळे वय ६० या आपल्या १३ वर्षीय नातू सुजित युवराज काळे याच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी बेंद शिवारात गेल्या होत्या. यावेळी एका शेळीचा पाय तुटून खाली पडलेल्या वीजवाहक तारेमध्ये अडकला. त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली.

हे दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो तारेला चिकटून तडफडू लागला. आपल्या डोळ्यासमोर नातू मृत्यूशी झुंज देताना पाहून आजी मालन काळे यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. पण दुर्दैवाने त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि शेळीसह आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. हातात हात असलेल्या अवस्थेत पडलेले आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. परिसरातील वीजवाहक तार गेल्या अनेक दिवसांपासून तुटून पडलेली होती, याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.