ज्याने आत्मसुखाची गोडी चाखली त्याला इतर गोष्टीत गोडी वाटत नाही
अध्याय पाचवा
भगवंत म्हणाले, निरिच्छ व्यक्तीला आत्मज्ञान झाले असल्याने तो सगळ्यापासून अलिप्त राहून व्यवहार करत असतो. त्याचे व्यवहार वरवर जरी दिसायला इतरांप्रमाणे असले तरी त्याच्या मनाची ठेवण मात्र वेगळी असते. त्याला समोर दिसणाऱ्या जगातील गोष्टी मिथ्या वाटत असल्याने त्यांचे आकर्षण वाटत नाही. त्यामुळे आवडलेली एखादी वस्तू मिळाली तर त्याला आनंद होत नाही किंवा मिळाली नाही म्हणून दु:ख होत नाही. सर्व विश्व ब्रह्मव्याप्त असल्याने त्याला जगातली प्रत्येक वस्तू ही ब्रह्मरूपच वाटत असते. मग ती त्याला प्रिय असो वा नसो. जीवनात मिळणाऱ्या गोष्टी किंवा न मिळणाऱ्या गोष्टी यांना आध्यात्मिकदृष्ट्या काहीच महत्त्व नसते. हे त्याला माहित असल्याने त्या मिळाल्या काय आणि न मिळाल्या काय त्याच्या दृष्टीने सारखेच असते. तो ब्रह्माशी समरस होऊन अक्षय्य सुखाचा अनुभव घेत असतो. ह्या अर्थाचा
विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते । ब्रम्ही मिसळला तेंव्हा भोगी ते सुख अक्षय ।। 21 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार माणसाला जेव्हा एखादी मोठी गोष्ट मिळते तेव्हा त्याच्या दृष्टीने लहान गोष्टीचे महात्म्य आपोआपच संपुष्टात येते. माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, तो ब्रह्माचा अंश असून सध्या जगत असलेले जीवन ही त्याची तात्पुरती अवस्था आहे हे त्याच्या लक्षात आलेले असल्याने, इंद्रीयसुखाच्या आनंदाची त्याला कधीच मात्तबरी वाटत नाही. तो आत्मस्वरुपाला घट्ट चिकटून बसलेला असल्याने, इंद्रियसुखाकडे फिरकत नाही. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कायम ब्रह्मरस चाखणाऱ्याला सुधारस कसा गोड लागेल? हे आत्मसुख त्याला अमर्याद आणि अखंड मिळत असल्याने त्याला इतर कोणत्याही सुखाची भुरळ पडत नाही. कमळाच्या पाकळीच्या पात्रावर शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करणारा चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय? त्याप्रमाणे ज्याला उत्कृष्ठ आत्मसुख प्राप्त झाले आहे त्याचे विषय सुटले हे काय सांगायला पाहिजे काय? त्याला उत्कृष्ट तेच मिळाले असल्याने आणि कायम मिळत राहण्याची खात्री असल्याने त्यापुढे गौण असलेले विषयसुख ज्याला मिळाले आहे त्याच्याबद्दल त्याला द्वेष किंवा मत्सरही वाटत नाही. अर्जुना तोच खरा समदृष्टी आणि ब्रह्मरूप झालेला आहे असे समज. ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते हेच!
भगवंत पुढे म्हणतात की, त्याला बाह्य गोष्टीत गोडी वाटत नाही कारण त्याने आत्मसुखाची गोडी चाखलेली असते. ज्याने अमृत प्यायले आहे त्याला गुळाच्या पाण्याचे काय कौतुक वाटणार? तो तर ब्रह्माशी समरस होऊन अक्षय्य सुखाचा अनुभव घेत असतो.
विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते । ब्रम्ही मिसळला तेंव्हा भोगी ते सुख अक्षय ।। 21 ।।
जेव्हा एखादी मोठी गोष्ट मिळते तेव्हा लहान गोष्टीचे महात्म्य आपोआपच संपुष्टात येते. जो नेहमी लक्झरी बसने प्रवास करतो त्याला तिकीट कमी असले तरी साध्या बसने प्रवास करावासा वाटत नाही.