मतोत्साहाचा अन्वयार्थ
आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेले मतदान विक्रमीच म्हटले पाहिजे. स्वाभाविकच येथील निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागतात की विरोधात जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांतील निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आसाममध्ये 85 टक्के, पुदुच्चेरीत 89.87 टक्के, तर केरळमध्ये 79 टक्के मतदान झाले. यातील आसाम आणि पुदुच्चेरीतील मतदान म्हणजे नवा उच्चांकच ठरावा. आसाम हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य होय. या राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाच्या लढाईत कुणाची सरशी होते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. बांगलादेशी घुसखोरी, एनआरसी-सीएएद्वारे नियंत्रणाचे आश्वासन, आसामी अस्मिता व कल्याणकारी योजना यांसारख्या मुद्द्यावर भर दिलेल्या भाजपसाठी राज्यात सकारात्मक वातावरण असल्याचे मानले जाते. सलग तिसऱ्यांदा भाजप राज्यात यश मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. किंबहुना, आसाममध्ये काँग्रेसचीही व्होटबँक आहे. शिवाय अॅन्टी इन्कबन्सी फॅक्टरही काँग्रेसला हात देण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, प्रादेशिक पक्षांमुळे होणारे विभाजन ही पक्षाच्या मार्गातील अडचण असेल. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे. तेथे एआयएनआरसी-भाजप आणि काँग्रेस-द्रमुक हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील. एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार तेथे पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी पुढे सरसावले आहे. रंगासामी यांची लोकप्रियता आणि दोन पक्षातील एकजूट हा एनडीएचा प्लस पॉईंट आहे. तथापि, काँग्रेसनेही तिथे जोर लावला आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीचा राजकीय व सांस्कृतिक अनुबंध असल्याने डीएमकेचाही तेथे प्रभाव दिसतो. पुदुच्चेरीला राज्याचा दर्जा मिळण्यासह काही मुद्दे काँग्रेस आघाडीने लावून धरले आहेत. त्यामुळे तेथे काट्याची टक्कर होईल. अर्थात छोट्या पक्षांची कामगिरी कशी होते, यावरही बरेच गणित अवलंबून राहील. केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यात काँग्रेस आणि डाव्यांमध्ये पूर्वापार संघर्ष आहे. मागच्या दोन टर्म येथे डाव्यांची सत्ता असून, तिसऱ्यांदा लाल बावटा फडकवण्यासाठी डावे प्रयत्नशील दिसतात. मतदानात उत्साह दिसत असला, तरी हा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे, हे पाहण्यासाठी निकालाच्या दिवसापर्यंत वाट पहावी लागेल. मजबूत केडर, कल्याणकारी योजना ही डाव्यांची ताकद आहे. मात्र, काही ठिकाणी त्यांना अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागला आहे. अॅन्टी इन्कबन्सी फॅक्टरचीही त्यांना धास्ती असेल. केरळात काँग्रेसचेही चांगले संघटन आहे. पक्षाने जोरदार ताकद लावल्याने डाव्यांपुढे आव्हान निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे दोन्ही पक्षांना या राज्यात समसमान संधी असल्याचे मानले जाते. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण विस्ताराला मर्यादा राहिल्या आहेत. परंतु, अलीकडच्या काळात भाजपाने दक्षिणेतही हात पाय पसरायला सुरुवात केल्याचे पहायला मिळते. तिरुवनंतपूरममध्ये मिळवलेले यश हा त्याचाच परिपाक. राज्यात भाजप शर्यतीत नसेलही. मात्र, 4 ते 5 जागांवर त्यांनी प्रभाव टाकल्याचे विश्लेषण केले जाते. खरेतर पक्षाला या राज्यात गमावण्यासारखे काही नाही. एक किंवा दोन जागा मिळाल्या, तरी पक्षासाठी ते बेरजेचेच राजकारण असेल. सर्वसाधारणपणे जादा मतदान म्हणजे सत्ताधारीविरोधी लाट, असे एकेकाळी मानले जायचे. पण, सध्याची स्थिती तशी नाही. अनेकदा अधिकचे मतदान म्हणजे सत्ताधाऱ्यांचा विक्रमी विजय, असाही निकालाचा अन्वयार्थ लावावा लागतो. हे लक्षात घेता या अधिकच्या मतदानाकडे एकाच चष्म्यातून पाहता येणार नाही. पुढच्या टप्प्यात तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्येही मतदान होत असून, तेथील मतटक्काही निर्णायक असेल.