For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेला चांगलाच दणका

06:31 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेला चांगलाच दणका
Advertisement

प्रवासी रेल्वेला विलंब होण्याचे प्रकार आता कमी झाले असले, तरी अजूनही गाड्यांना विलंब होतो, असा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे बऱ्याचदा प्रवासी वैतागतात. रेल्वेला विलंब झाल्याने कित्येकांची महत्वाची कामेही चुकतात आणि त्यांची व्यावसायीक किंवा आर्थिक हानी होते. उत्तर प्रदेशातील बस्ती येथे वास्तव्य करणाऱ्या समृद्धी नामक विद्यार्थिनीच्या संदर्भात असा प्रकार घडला आहे. ही विद्यार्थिनी ‘नीट’ ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणार होती. तिचे परीक्षा केंद्र अन्य शहरात होते. त्यामुळे तिने रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला. ती वेळेवर रेल्वे स्थानकार पोहचली. तिने आधीच आसन राखून घेतले होते. तथापि, संबंधित रेल्वेला नेमका त्याच दिवशी 4 तास विलंब झाला. त्यामुळे तिची परीक्षा चुकली.

Advertisement

पण तिने स्वस्थ न बसता झाल्या प्रकारासंबंधी ग्राहक न्यायालयात आवेदनपत्र सादर केले. रेल्वेविरोधात तिने हानीभरपाईसाठी प्रकरण नोंद केले. ग्राहक न्यायालयाने रेल्वेला विलंब का केला, याची चौकशी करण्याचा आदेश दिला. तपासाअंती असे आढळले की, गाडीला विलंब रेल्वेव्यवस्थापनाच्या बेपर्वाईमुळेच झाला होता. याचा अर्थ असा की, रेल्वेने चूक केली नसती, तर ही रेल्वे वेळेवर धावणे अशक्य नव्हते. गाडीला विलंब कोणत्याही अपरिहार्य कारणाने किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने झाला नव्हता. ही बाब स्पष्ट होताच, ग्राहक न्यायालयाने रेल्वेच्या विरोधात निर्णय दिला. या विद्यार्थिनीला 9 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला. ही घटना 7 वर्षांपूर्वीची आहे. ग्राहक न्यायालयाने 7 वर्षांच्या नंतर हा निर्णय दिला आहे. या विद्यार्थिनीने सात वर्षे हा संघर्ष केला. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. बऱ्याचदा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे फटके सर्वसामान्यांना बसतात. तथापि, कित्येक लोक त्याविरोधात पावले उचलण्यास कचरतात. कारण, प्रशासनाच्या विरोधात कारवाई करण्यात त्यांचा बराच पैसा आणि वेळ वाया जाण्याची शक्यता असते. मात्र, या विद्यार्थिनीने हा संघर्ष नेटाने आणि न कंटाळता केल्याने तिला अखेर न्याय मिळाला आहे. हे उदाहरण इतरांसाठीही बोधप्रद असून ही घटना सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.