अश्लील भाषेत टीका होऊनही पंतप्रधानांनी निवडली करुणा
मुख्यमंत्री डॉ. सावंत : राज्यातील जनतेने पूर्णपणे नकारात्मकता टाळावी
त.भा. प्रतिनिधी
पणजी : नुकत्याच दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अश्लील भाषेचा वापर करून वैयक्तिक टीका केली गेली असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रागाऐवजी करुणेचा मार्ग निवडला, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे केले आहे. तसेच गोव्यातील जनतेने ही शिवराळ भाषा, चुकीची माहिती आणि नकारात्मकता पूर्णपणे नाकारावी, असे जाहीर आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समाजमाध्यमांवर जारी केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, देशाचे नेतृत्व करत असताना पंतप्रधानांवर झालेल्या अशा हीन पातळीवरील टीकेनंतरही त्यांनी दाखवलेला संयम हा प्रेरणादायी आहे. राजकीय किंवा सामाजिक आंदोलनांच्या नावाखाली अशा प्रकारची असभ्य भाषा वापरणे लोकशाहीत निषेधार्ह आहे.
गोवेकरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारे द्वेष, अफवा आणि नकारात्मक वातावरण पसरू नये यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याची संस्कृती ही शांतताप्रिय आणि सुसंस्कृत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील जनतेने अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा, दिशाभूल करणारी माहिती आणि सामाजिक तेढ निर्माण करणारी नकारात्मकता साफ फेटाळून लावली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.