For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईल हरविला, आणि...

06:40 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल हरविला  आणि
Advertisement

जपान या देशासंदर्भात एक अद्भूत घटना घडली आहे. या देशातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मोबाईल काही दिवसांपूर्वी हरविला. यात विशेष काय, असे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. कारण अनेकांचे मोबाईल हरवितात. नंतर पोलिसांमध्ये तक्रार केली जाते. काही मोबाईल सापडतात तर काही सापडत नाहीत. नंतर ही घटना विसरली जाते. पण या जपानी अधिकाऱ्याचा मोबाईल हरविल्याने जपानचा आण्विक धोका वाढला आहे. कारण, हा जपानी अधिकारी चीनच्या दौऱ्यावर गेला असताना तेथे त्याचा हा भ्रमणध्वनी हरविला. हा अधिकारी साधासुधा नाही, तर जपानच्या अणुऊर्जा आयोगाचा उच्चपदस्थ अधिकारी आहे.

Advertisement

त्याच्या मोबाईलमध्ये जपानच्या इतर अनेक अणुऊर्जा संबंधित अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती होती. तसेच जपानच्या अणुकार्यक्रमाविषयीही काही गुप्त माहिती असावी, असे अनुमान आहे. हा मोबाईल चीनमध्ये हरविल्याने जपानसमोर संकट उभे राहिले. कारण, चीन आणि जपान यांचे फारसे पटत नाही. हे दोन्ही देश आशिया खंडातील बलाढ्या देश आहेत. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात त्यांची एकमेकांशी मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे जपानच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्याचा मोबाईल चीनमध्ये हरविणे ही बाब अत्यंत संवेदनशील ठरली. या मोबाईलमधील माहिती किंवा डाटा चीनच्या हाती सापडला तर जपानचा अणुकार्यक्रम चीनला समजू शकतो आणि जपान संकटात लोटला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

हा अधिकारी चीनला त्याच्या कार्यालयीय कामासाठी नव्हे, तर खासगी दौऱ्यावर गेला होता. चीनच्या शांघाय विमानतळावर तपासणी होत असताना त्याचा मोबाईल हरविला. तो कसा हरविला, हे एक गूढच आहे. तो हरविला, की पळविण्यात आला, याविषयीही स्पष्टता नाही. तो अद्याप मिळालेला नाही, असे बोलले जाते. तो स्मार्टफोन असल्याने त्याच्यातील विदा किंवा डाटा सहजासहजी ‘लीक’ होणे अशक्य आहे. पण चीनचे कौशल्यवान मोबाईलतज्ञ ही माहिती मिळवूही शकतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता हा किती गंभीर प्रकार आहे, याची कल्पना येते. जपानने उच्च पातळीवरुन या संदर्भात प्रयत्न चालविलेले आहेत. ते प्रयत्न चीन यशस्वी होऊ देईल का, हा प्रश्न आता जपानच्या प्रशासनाला सतावत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.