रंगीबेरंगी राख्यांनी सजली बाजारपेठ
रक्षाबंधनाला अवघे चार दिवस : खरेदीसाठी रविवारी बहिणींची गर्दी
त. भा. प्रतिनिधी
पणजी : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे बंध अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला आता अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने पणजीतील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. विविध प्रकारच्या, आकर्षक डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या किंमतींच्या राख्या बाजारात दाखल झाल्या असून, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने राख्यांच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.
यंदा बाजारात पारंपरिक राख्यांसोबतच फॅन्सी, मोत्यांच्या, कुंदन, स्टोनवर्क, मेटल तसेच विविध रंगसंगतीतील राख्यांना मागणी आहे. 10 ऊपयांपासून 300 ऊपयांपर्यंत राख्यांचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येकाच्या बजेटनुसार खरेदी करता येत आहे. बहिणींकडून भावाच्या आवडीनुसार राखी निवडण्याला प्राधान्य दिले जात असून, आकर्षक पॅकिंगमध्ये राख्याही उपलब्ध आहेत.
कार्टून थीमच्या राख्यांचे लहानग्यांना आकर्षण
लहान मुलांसाठी बाजारात विशेष आकर्षण ठरत आहेत त्या विविध कार्टून थीमच्या राख्या. मुलांना आवडणाऱ्या कार्टून पात्रांच्या प्रतिमा, रंगीत डिझाईन आणि आकर्षक आकारातील राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी खरेदीसाठी येणारी मुलेही आपल्या आवडीची राखी निवडताना दिसत आहेत.
राख्यांसोबत रक्षाबंधनाच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याचीही बाजारात रेलचेल आहे. आकर्षक सजावट केलेल्या आरती थाळ्या, रोळी-कुंकू, अक्षता, दिवे, फुले तसेच अन्य पूजासाहित्य विविध प्रकारांत उपलब्ध झाले आहे. तयार आरती थाळ्यांना विशेष पसंती मिळत असून, वेळेअभावी तयार संच घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
शेवटच्या दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता
रक्षाबंधनासाठी बहिणींकडून भावांसाठी भेटवस्तूंचीही खरेदी केली जात आहे. कपडे, चॉकलेट्स, गिफ्ट पॅक तसेच विविध भेटवस्तूंची दुकानेही सजली आहेत. सणाला काही दिवसच शिल्लक असल्याने आगामी दोन-तीन दिवसांत बाजारातील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अनेकांनी कुटुंबासह पणजीच्या बाजारपेठेत येऊन राखी व रक्षाबंधनाच्या साहित्याची खरेदी केली. त्यामुळे सणाच्या चार दिवस आधीच पणजीच्या बाजारपेठेत रक्षाबंधनाचा उत्साह आणि चैतन्य जाणवू लागले आहे.