For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मी कर्ता आहे हा माणसाचा समजच त्याला अनेक संकल्प करायला लावतो

06:14 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मी कर्ता आहे हा माणसाचा समजच त्याला अनेक संकल्प करायला लावतो
Advertisement

योगारूढ झालेल्या योग्याची चिन्हे सांगताना भगवंत म्हणाले, केलेल्या कर्माच्या फळात त्याचे मन गुंतलेले नसल्याने त्याच्या मनाला सुखदु:खांनी धक्के दिले तरी ते जागे होत नाही. तो देहधारी असून जागा असल्याप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो. आपला आपण उद्धार करावा, अवनती करू नये. आपण स्वत:च स्वत:चे मित्र आहोत व स्वत:च स्वत:चे शत्रू आहोत हे लक्षात ठेवावे. आपला उद्धार करायला इतर कुणी उपयोगी पडेल अशी शक्यता नसते. ह्या अर्थाचा

Advertisement

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी । आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ।। 5 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार जीवनात घडणाऱ्या प्रसंगात जो नफ्यातोट्याचा विचार न करता नितीन्यायाला धरून वागतो त्याचा निश्चित उद्धार होतो म्हणून लोकांनी काहीही सांगितले तरी आपण यथायोग्यच वागावे आणि निरपेक्ष रहावे म्हणजे आपला निश्चित उद्धार होतो.

श्लोकाचे विवरण करताना माउली पुढे म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, माणसाचा आत्मा बघायला गेलं तर निर्लेप असतो परंतु त्रिगुणांनी वेढला गेलेला असल्याने त्याला आत्मस्वरूपाचा विसर पडून तो देहाचे भले कसे होईल ह्या अनात्म विचारात असल्याने आध्यात्मिकदृष्ट्या निद्रिस्त असतो. झोपेत तो जन्ममरणरूपी वाईट स्वप्न अनुभवतो. येथे माऊलीना असे सुचवायचे आहे की, जेव्हा माणसाला समोरची दुनिया खरी वाटत असते त्यावेळी त्याचा आत्मा अविवेकाच्या काजळीने घेरलेला असल्याने विवेकहीन झालेला असतो. तो झोपलेल्या अवस्थेत जन्ममरणाचे स्वप्न पहात असतो. हे स्वप्न बराच काळ म्हणजे अनेक जन्म चालू असते. जेव्हा त्याला आपण देहापेक्षा वेगळे आहोत हे समजते तेव्हा त्याला जाग आल्याने तो पहात असलेले जन्ममरणाचे स्वप्न आपोआपच व्यर्थ होते. आपल्या नित्य अस्तित्वाचा सहज प्रत्यय आत्म्याला येतो. अर्जुना, मिथ्या देहाभिमानामुळे मनुष्य देह म्हणजेच मी असे मानून, मायेपुढे हार पत्करून आपला आपण घात करून घेतो.

Advertisement

उद्धरावा स्वये आत्मा म्हणजे आपणच आपल्या आत्म्याचा उद्धार करून घ्यायचा आहे त्यासाठी स्वत:च्या मनावर ताबा हवा म्हणजे ते निरनिराळ्या इच्छांमुळे मनात येणाऱ्या विचारांनी भरकटणार नाही. मन स्थिर झाले की, ते आपोआपच विवेकबुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेऊन त्याप्रमाणे कृती करू लागते आणि मग आत्म्याचा उद्धार होण्यास वेळ लागत नाही.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ज्याने स्वत:च्या आत्म्याला जिंकले तो स्वत:चा बंधु होय. जो आपल्या आत्मस्वरूपास जाणत नाही तो स्वैर वर्तनाने तो स्वत:शीच शत्रुत्व करतो.

जिंकुनी घेतला आत्मा बंधु तो होय आपुला । सोडीला तो जरी स्वैर शत्रुत्व करतो स्वये ।। 6।।

मी कर्ता आहे हा माणसाचा समजच त्याला मी असे करीन, मी तसे करीन असे अनेक संकल्प करायला लावतो आणि त्याप्रमाणे घडले तर तो खुश होतो आणि जर घडले नाही तर दु:खी होतो. असे सुख, दु:खाच्या आहारी जाणे टाळून सदैव आनंदी राहावे.

Advertisement
Tags :

.