द लिलाची नव्याने होणार 5 लक्झरी हॉटेल्स, आयपीओ खुला
पर्यटनस्थळी होणार हॉटेल्स : 3500 कोटीचा आयपीओ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ब्रुकफिल्डचा पाठिंबा असणाऱ्या स्क्लॉस बेंगळूर लिमिटेड यांच्याकडून भारतात लक्झरी हॉस्पिटॅलिटी ब्रँड द लिला पॅलेस हॉटेल व रिसॉर्टस चालवले जाते. देशातील पाच प्रमुख पर्यटन स्थळी जसे की आग्रा, श्रीनगर, बांधवगड, रणथंबोर आणि अयोध्या या ठिकाणी 5 नवी हॉटेल्स सुरु करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. यासोबत कंपनीने आपला आयपीओ आणला असून याअंतर्गत 3500 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
वरील 5 ठिकाणी होणाऱ्या हॉटेल्सकरीता कंपनी जवळपास 1131 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. एकंदर 475 खोल्यांची उभारणी केली जाणार आहे. द लिलाचे मुख्य आर्थिक अधिकारी व अॅसेट मॅनेजमेंट हेड रवि शंकर यांनी सांगितले की वरील सर्व हॉटेल्स कंपनीच्या अधिपत्याखाली असणार असून 2028 पासून प्रत्यक्षात सुरु होणार आहेत.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातला मोठा आयपीओ
दुसरीकडे कंपनीने आपला आयपीओ आणला आहे. आयपीओ सोमवारी गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे. 3500 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार असून भारतात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातला सर्वात मोठा आयपीओ असणार असल्याचे बोलले जात आहे.
कंपनीचा विस्तार
कंपनीची एकंदर 20 हॉटेल्स असून ज्यात 13 सध्याला कार्यरत आहेत. ब्रुकफिल्ड ही अमेरिकेतील गुंतवणूक फर्म असून द लिलाचे 2019 मध्ये तिने अधिग्रहण केले. आयीपीओतून ब्रुकफिल्ड आपली 24 टक्के हिस्सेदारी विक्री करेल. ज्यानंतर त्यांच्याकडे 76 टक्के हिस्सेदारी शिल्लक राहिल.
आयपीओनंतर कर्जमुक्ती
आयपीओकरीता 413 ते 435 रुपये इतकी इशु किंमत निश्चित केली आहे. यात 2500 कोटी रुपयांचे ताजे समभाग बाजारात सादर केले जातील. कंपनीच्या डोक्यावर मार्च 2025 पर्यंत 3900 कोटी रुपयांचे कर्ज आहे. आयपीओ उभारणीतून हे कर्ज फेडले जाईल. आयपीओनंतर ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झालेली असेल.