जादा ‘आय’च्या मोहात तो अडकला जाळ्यात!
आयकर अधिकाऱ्याला लाच घेताना अटक : बिले फेडण्यासाठी मागितली होती लाच
पणजी : आयकर विभागातील सहाय्यक लेखाधिकारी अतुल वाणी याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने एका कंपनीची प्रलंबित बिले देण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुऊवारी दुपारी पाटो पणजी येथील सेंट्रल लायब्ररीजवळ घडली. सुरक्षा आणि हाऊसकीपिंग सेवा पुरवणाऱ्या राज एंटरप्रायझेस या कंपनीची गेल्या सहा महिन्यांची बिले प्रलंबित होती. आयकर भवन,पणजी येथील आयकर विभागाच्या कार्यालयात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून काम करणाऱ्या अतुल वाणीने बिलाची प्रक्रिया करण्यासाठी राज एंटरप्रायझेसकडून लाच मागितल्याचा आरोप आहे. कंपनीने ही लाच देऊ केली आणि बुधवारी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने काल गुरुवारी कारवाई केली. अतुल वाणीच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर छापे टाकले.
सेंट्रल लायब्ररीजवळील पार्किंगमध्ये लाचेचा व्यवहार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. वाणी त्याच्या आलिशान कारमध्ये बसलेला असताना त्याने पैसे स्वीकारले. तेव्हाच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्याला या कृत्यामध्ये रंगेहात पकडले. एकूणच आयकर विभागातील अधिकारी असून जादा उत्पन्नाच्या नादात तो शेवटी सीबीआयच्या जाळ्यात अडकला. सीबीआयच्या 12 जणांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी महिला अधिकारीदेखील उपस्थित होत्या. पथकाने पाटो येथेच संशयिताच्या हाताचे ठसे घेतले. पैशांवरील हाताचे ठसेदेखील तपासले. त्यानंतर आयकर खात्यात अतुल वाणी याच्या कार्यालयातही सीबीआयच्या पथकाने छापा टाकला.