ज्ञानाचा उदय ज्याच्या ठिकाणी झालेला असतो, तो स्वत:ला कर्ता समजत नाही
अध्याय पाचवा
भगवंत म्हणाले, कर्मयोगात निष्णात झालेल्या साधकाच्या अंगी कर्मयोग भिनलेला असतो. त्यामुळे त्याच्या मूळ स्वभावात बदल झालेला असल्याने, आपण निरपेक्षतेने कर्म करायचे आहे हे त्याला लक्षात ठेवावे लागत नाही. त्यांची संपूर्ण चित्तशुद्धी झालेली असल्याने त्याच्या देहावर त्याचा पूर्णपणे ताबा असतो तसेच त्याची इंद्रिये त्याच्या हुकुमानुसार वागत असतात. त्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्म्याशी एकरूप झालेला असतो. असा मनुष्य कर्म करीत असला तरी त्याच्या फळात त्याचा जीव अडकलेला नसतो. त्याने त्याचे मन आणि बुद्धी सद्गुरुना अर्पण केलेली असते त्यामुळे हे शक्य होते. असे निर्विकार मन सद्गुरूंच्या उपदेशाने भरून गेल्याने आत्मस्वरूपमय झालेले असते.
त्याच्या दृष्टीने कर्ता-कर्म-कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार आपोआपच बंद पडलेला असल्याने त्याने काही कार्य जरी केले तरी ते त्याने केले असे होत नाही. त्याला आपल्या देहाची कोणतीच शुद्धबुद्ध नसते. ज्याप्रमाणे ईश्वरी प्रेरणा होईल त्याप्रमाणे त्याच्या हालचाली व वागणेबोलणे होत असते. सत्पुरुषांची चरित्रे अभ्यासली तर हे सहजी लक्षात येईल की, अशा अवस्थेत पोहोचलेल्या आत्मज्ञानी व्यक्तींचे बोलणे किंवा त्यांनी केलेल्या कृती सामान्य माणसाच्या सहजी लक्षात येत नाहीत. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, योगी मनुष्याला हे माहीत असतं की, तो स्वत:हून जरी काही करत नसला तरी त्याची इंद्रिये पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, फिरणे, झोपणे, श्वास घेणे, बोलणे, मौन धारण करणे, पापणी हलवणे इत्यादि नैसर्गिक कामे त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार करत असतात.
न काही मी करी ऐसे योगी तत्त्व-ज्ञ जाणुनी । देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे श्वसे ।। 8 ।।
बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी । इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हे चि पाहतो ।। 9।।
भगवंताचे सांगणे आणखीन स्पष्ट करताना श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सामान्य मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असतो त्यामुळे तो करत असलेल्या व्यवहारात तो मनाने गुंतलेला असतो. मात्र कर्मयोग्याला ‘मी म्हणजे हा देह’ अशी आठवणच नसल्याने तो स्वत:ला कर्ता समजत नाही. सृष्टीनिर्मिती करूनसुद्धा परमेश्वर स्वत:ला कर्ता समजत नसल्याने परमात्म्याप्रमाणेच कर्मयोग्याचा स्वभाव असल्याचे प्रत्ययाला येते. तो इतर लोकांप्रमाणे शरीरात असून, सर्व व्यवहार करत असताना दिसतो.
इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य असे की, तो त्या व्यवहारात मनाने नसतो. त्यालाही इतरांसारखे स्पर्शज्ञान असते. तो नाकाने वास घेतो, समयोचित बोलत असतो. आहाराचे सेवन करतो, झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. पायाने चालताना दिसतो. एव्हढेच काय श्वास घेणे, सोडणे आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मेही तो करत असतो परंतु हे सर्व ईश्वरी प्रेरणेने होत असल्याच्या जाणिवेमुळे तो स्वत:ला कर्ता समजत नाही.
ह्याचे कारण असे की, ज्यावेळी तो आपण कर्ते आहोत ह्या गैरसमजुतीत होता त्यावेळी मी अमुक एक करीन मग तमुक फळ मला मिळेल अशी स्वप्ने पहात होता पण आता त्याच्यात ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो जागृत झालेला असतो. आपण कर्ते नाही हे त्याला उमजलेले असते. सामान्य माणसे स्वत:ला कर्ता समजत असल्याने ती मात्र झोपेत राहून कर्तृत्वाची स्वप्ने पहात असतात.
क्रमश: