चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला
आता हळूहळू थंडी वाढण्याची चिन्हे : हवामान विभागाचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठवड्यात देशाच्या पूर्व किनारपट्टीला धडकलेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव आता जवळजवळ संपला आहे. या चक्रीवादळाच्या टप्प्यात आलेल्या राज्यांमध्ये आता पाऊस पडण्याची चिन्हे मावळली आहेत. तथापि, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हिमाचलमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 3-4 दिवसांत डोंगराळ राज्ये आणि मैदानी भागात तापमान कमी झाल्यामुळे थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबरच्या रात्रीपासून पश्चिमी विक्षोभ सक्रिय होईल. तत्पूर्वी सध्या कुकुमसेरीमध्ये तापमान उणे 1.2 अंश सेल्सिअस आणि ताबोमध्ये उणे 0.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात प्रदूषण वाढत असून रविवारी हवेची गुणवत्ता आणखी खालावली. एम्स इस्पितळ आणि आसपासच्या परिसरात ही पातळी 420 वर पोहोचल्याची नोंद झाली आहे.