ना बोले रे...
स्पॉटिफायवर अशीच गाणी लावून ठेवली तर त्यात स्पॉटिफायवरच्या सजेशनप्रमाणे आपोआप गाणी लागत जातात. आपलं लक्ष नसलं तरीही गाणी चालूच असतात. पण प्लेलिस्ट न करता अशी चालू ठेवलेली गाणी कित्येकदा आपल्याला छान छान गाणी मिळवून देतात. अशीच गाणी लावलेली असताना एक गाणं ऐकायला मिळालं.
राधा ना बोले ना बोले ना बोले रे
घूँघट के पट ना खोले रे
गाणं अतिशय सुंदर आहे यात काही वादच नाही. पण मला गंमत वाटली, की ‘न बोलणे’ या विषयावर किती बोललेलं आहे या गाण्यात? मोठा विरोधाभास आहे. यात जे सुचवायचं ते सगळं सुचवलेले आहे. ती का बोलत नाही हेही सांगितलेलं आहे. पण गाण्याचा सगळा फोकस हा राहतो ती बोलत नाही याच्यावरच. कृष्णकन्हैया आणि राधाराणी यांच्यातल्या नात्यावर तर संगीताचं विश्व उभं आहे, असं म्हणणं संयुक्तिक ठरेल. त्यामुळे कितीतरी छोट्या छोट्या सुंदर गोष्टींचं वर्णन या गाण्यात येतंच. पण मग प्रश्न पडतो जर का बोलायचं नसेल तर मग त्याच्याविषयी एवढं बोलायचं कशाला? बाकी न बोलण्याची कारणं अनेक असतात. राग असतो, द्वेष असतो, लाज असते आणि बरंच काही असतं. काही वेळा बोलणं बंद होतं तर काही वेळा बोलती बंद होते. संवाद करण्याची एखाद्याची इच्छा असूनही दुसऱ्याला संवाद करायचा नसेल तर बोलणं होऊ शकत नाही. बऱ्याचदा होतं काय, की रागापोटी माणूस एखाद्याशी बोलणं टाकून देतो. त्यातही एक वैशिष्ट्या असं असतं की ‘मला तुझ्याशी बोलायचं नाही’ हे स्पष्ट बोलणंही माणसाला जमत नसावं. किंवा मुद्दामूनही टाळलं जातं. परिणाम असा होतो की आता हा संवाद बंद होतो आणि माणूस शोधायला लागतो. मग त्याला लक्षात येतं की अमुक एक व्यक्ती माझ्याशी बोलत नाहीये. विसंवादाकडून संवादाकडे जाण्याचा एक प्रवास सुरू होतो.
संवाद हा सुंदर असतो. बंद झालेला संवाद म्हणजे ताण असतो. परंतु बऱ्याचवेळा होतं असं, की प्रत्यक्षात बोलायचं असतं आणि मला बोलायचं नाही असं सूचकपणे सांगितलं जातं आणि मग खरी गंमत सुरू होते. मग करायचं तरी काय? म्हणजे प्रत्यक्षात जर मला त्यांनी माझ्याशी बोलणं अपेक्षित असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे असं समोरूनच सुचवलं जातं. शहाणी व्यक्ती याच्या पाठीमागचा सूचक अर्थ सहज शोधून काढू शकते. ज्या प्रेमवीराची पहिलीच वेळ असते त्याला कळतच नाही की जर बोलायचं नाहिये तर इशारे करून, दुसऱ्याशी बोलून, टोमणे मारून, नक्की काय सुचवलं जातंय? आणि तो त्या संवाद विसंवादाच्या जंजाळात फसायला सुरुवात होते. कित्येकदा मला बोलायचं नाही हे सुचवणं इतकं रंजक आणि सुंदर असतं त्याचं एक लक्षात राहिलं सोदाहरण म्हणजे
नाही मी बोलत नाथा
विनयहीन वदता
संगीत मानापमान या नाटकातलं हे गीत.
त्या वेळेचा शृंगार हा सूचक असे म्हणून तो सुंदर असे. कुठलीही गोष्ट झाकून ठेवली तर त्यातलं अप्रूप टिकतं. सगळ्याच गोष्टी आणू नये तेव्हा जर उघड्यावर आणल्या जात असतील तर मग त्यात काहीच मजा शिल्लक उरत नाही हे सत्य आहे. पुलंच्या ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकात त्यांनी त्यावेळच्या आधुनिक अमेरिकेचे केलेले वर्णन आहे. की कुत्र्यामांजरासारखे देहाचे उपभोग घेऊनही जर का समाधान होत नसेल तर मग झिंग करणे, नशा करणे या गोष्टी सुरू होतात. आणि शेवटी सगळ्या संवेदनांचा चिखल तेवढा मेंदूत शिल्लक राहतो.
पण ही गोष्ट फार नंतरची झाली. त्या गीतातली शृंगाराची सूचकता लक्षात घेतली तर मोठी गंमत वाटते. ‘तो शालू तू नेसत असतानाच सुंदर दिसत होता’. हे एक वाक्य पडद्यापाठीमागे असणारा सगळा शृंगार अवगुंठित स्वरूपात दाखवून जातं. तेही ती आपल्या सखीला सांगत असते. तिचा आणि त्याचा प्रत्यक्ष संवाद रंगभूमीवर दाखवलेला नाही. कारण बीभत्सपणा टाळण्याकडे तेव्हा कल असे. तिला खरं तर त्याच्याशी खूप काही बोलायचं आहे. नाही मी बोलत असं म्हणून ती आपली लज्जा प्रकट करते. त्याच्याविषयी असणारं तिचं प्रेम, आणि म्हणूनच त्याने इतकं वात्रट बोलायला तिची असलेली मूक संमती हे सगळं काही ती दर्शवते ते या एका वाक्यातून. न बोलण्यासाठी केलेला एवढा बोलण्याचा हा खटाटोप! आहे ना गंमतीशीर? तसंच लतादीदींचंच एक नितांतसुंदर गाणं,
जा तोसे ना मैं बोलू कन्हैया
राह चलत पकडे मोरी बैया
म्हणजे तो तिचा जो छळवाद करतो तो तिला खरं तर हवाहवासा वाटतो. पण तसं स्पष्ट बोलणं म्हणजे मर्यादा सोडणं ठरेल. म्हणून मग ती त्याला सतत सांगते की हा छळवाद तू करू नकोस. मी तुझ्याशी बोलणार नाही. प्रत्यक्षात ते ‘परिवार’ या सिनेमामधलं सबिता मुखर्जी आणि असीम कुमार यांच्यावर चित्रित झालेलं वेगळ्या सिच्युएशनमधलं गीत आहे.
मी बोलणार नाही असं सांगणारी गाणी आली की शास्त्राrय संगीतातील काही चिजा हमखास आठवतात. त्यातलीच एक चीज म्हणजे पटदीप या रागातली ‘मैं तुमसंग ना बोलू पिया’ ही चीज आठवतेच आठवते. त्यातली ती तर स्पष्टच बजावते की,
हमरी तुमसंग नाही बने रे
रात कटी सब सौतन घरवा
ढीठ लंगरवा छोड़ो मोरी बइया
मैं तुमसंग ना बोलूँ पिया
ज्या काळाबद्दल ही चीज घडवली गेली आहे त्या काळात सवत असणंही इतकी सर्वसामान्य गोष्ट होती की सवतीच्या घरी तो जाऊन आला म्हणून फक्त त्याच्यावर रुसून बसणे इतपतच स्वातंत्र्य बायकांना होतं. स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागत असेल त्याची वेदना यात कुठेतरी आहे, जी आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्याही काळात जहाल स्वत्व असलेल्या बायका अस्तित्वात असणारच आहेत, हे सोहनी रागातील
काहे अब तुम आये हो मेरे द्वारे
या नितांतसुंदर असलेल्या संतापावरून पटतं. तो एक वेगळा भाग आहे. न बोलणेविषयी असलेल्या बोलण्याचे हे निरनिराळे टप्पे. अशी एकेक गाणी आठवत आणि ऐकत बसलेली असतानाच एकाएकी
नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करिसी खुणा
करू नको पुन्हा हा गुन्हा
हे गाणं लागलं आणि मग बोलू नकोस असं सांगणारी ती डोळ्यासमोर आली. हिची परिस्थिती फारच निराळी आहे. ती विवाहित आहे. तिच्या माहेरचा ‘मैतर जुना’ तिला भेटलेला आहे. पण कुठे तर भर बाजारात! कशी करणार ती त्याच्याशी संवाद? एकतर सासुरवाशीण स्त्राr. त्यात परत परपुरुषाशी संवाद. आणि तोही शंभर वर्षांपूर्वीच्या काळात. कसं शक्य आहे हे? तिची त्याला न बोलण्यासाठीची विनवणी इतकी कळकळीची आहे की काय पुसावी?
नको धरूस राग जरा समजून वाग
तुझ्या डोळ्यात अवखळपणा.
लाख लोकांचा हाट नको अडवूस वाट
धर आवरून आपल्या मना
हे सगळं का? तर संवाद हवा आहे पण तो करणं परवडणार नाही, कदाचित हाकलून दिलं जाईल आणि मग निवारा नाहिसा होईल. आता हाक मारणारा मैतर तेव्हा जबाबदारी घ्यायला येणार नाही. आला तरी त्याच्या घरच्यांना चालणार नाही. असंही असतं न बोलण्यापाठीमागचं एखादं कारण! मग बोलावंच कशाला?
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु