कर्ता असून अकर्ता
अध्याय पाचवा
परमेश्वराबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, माणसाचे कर्तेपणा, कर्म अथवा कर्माचा फलाशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही. माणसाचा स्वभावच ते सर्व करतो. परमेश्वर आपल्याला कर्म कसे करावे हे सांगत नाही तसेच आपण करत असलेले कर्म चांगले की वाईट हेही ठरवत नाही. आपल्या स्वभावानुसार आपण कर्मे करत असतो आणि स्वभाव त्रिगुणांपासून तयार होतो. तो चांगला होण्यासाठी, आपल्याला जो काही स्वभाव मिळाला असेल त्याचा स्वीकार करून तो जास्तीतजास्त सात्विक कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी संतांच्या साहित्याचा अभ्यास केला की, आपणही त्यानुसार वागावे असे वाटू लागते. त्यामुळे आपल्या स्वभावात हळूहळू फरक पडत जाऊन तो सात्विक होत राहतो. सात्विक स्वभावाच्या माणसाकडून घडणारी कर्मे ही सात्विकच असतात. संतसाहित्य आपल्याला कुणासाठी काय करायचे ह्याचे मार्गदर्शन करते. त्यानुसार सांगितलेले कर्म निस्वार्थ बुद्धीने केले की, कर्मयोगाचे आपल्याकडून आपोआपच आचरण होत राहते.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, ईश्वर कोणाचे पाप घेत नाही की पुण्य घेत नाही. येथे ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले आहे, त्यामुळे प्राण्यांना मोह होतो. परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नाश पावले आहे, त्यांना सूर्याच्या प्रकाशात वस्तू जशा स्वच्छ दिसतात त्याप्रमाणे परब्रह्म स्वच्छ दिसू लागते.
न घे पाप हि कोणाचे न वा पुण्य हि तो विभु। अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित ।। 15।। गेले अज्ञान ते ज्यांचे आत्म-ज्ञाने तयां मग । पर-ब्रम्ह दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले ।।16 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्ञान आणि अज्ञान ह्यामुळे माणसावर कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करताना भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सर्व प्राणी स्वत:ला कर्ता समजून कर्म करत असतात. त्यामुळे तयार होणारी सर्व पापपुण्ये ही त्यांचीच मालमत्ता होते. अर्थात अज्ञानामुळे त्यांच्या हे लक्षात येत नाही. परमेश्वर उत्पन्न करतो, पालन करतो, पण तो त्यात गुंतून पडत नसल्याने तो कर्ता असून अकर्ता असतो. तो कर्ता आहे असे केवळ अज्ञानामुळे वाटते. ते अज्ञान ज्यावेळेला संपूर्ण नाहिसे होते, त्यावेळेला मनावर आलेली गैरसमजाची काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व पटते. ईश्वर अकर्ता आहे, असे जर चित्ताला पटले आणि मीही जर त्याचाच अंश आहे तर उघडच मीही अकर्ता आहे असे विचार चित्तात जागृत झाले की, त्याला सर्व ब्रह्मव्याप्त आहे हे लक्षात येते. त्यामुळे कुठेही भेदभाव करावासा वाटत नाही. त्यामुळे सर्व जग मुक्त आहे असे तो समजतो.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, ज्यांच्या सर्व विश्व ब्रह्मव्याप्त आहे हे लक्षात आलेले असते ते सदैव त्याच विचारात गुंग असतात. बुद्धी सदैव त्याच्या चिंतनातच रंगलेली असते. त्या परब्रह्माशी ते इतके एकरूप होतात की, त्यांना आपणच ते परब्रह्म आहोत असे वाटू लागते. ते लोक पुन्हा ह्या जगात येत नाहीत कारण आत्मज्ञानाच्या योगाने त्यांचे पाप नाहीसे झालेले असते.
रंगले त्यात ओतूनि बुद्धि निश्चय जीवन । पुन्हा येती न माघारे ज्ञाने पाप धुऊनिया ।।17 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, सूर्य जरी पूर्वेला उगवत असला तरी त्यामुळे इतरही दिशातील काळोख नाहीसा होतो. त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेला साधक स्वत:ला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेऊन तो रात्रंदिवस त्याच्या अनुसंधानात राहतो.
क्रमश: