पोलीस खात्यात नोकरीचे आमिष दाखवून गंडवले
वास्कोतील माता-पुत्राला अटक
वास्को : वास्कोत शासकीय नोकरीसाठी पैसे घेण्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. मुलाला पोलीस खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला सहा लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बायणातील उमा पाटील आणि तिचा पुत्र शिवम पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या शनिवारी बायणातीलच सूरज नाईक व गोविंद मांजरेकर यांच्याविरुद्ध नोकरीसाठी पैसे घेतल्या प्रकरणी फसवणुकीची तक्रार नवेवाडे वास्कोतील महिलेने केली होती. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. सोमवारी व मंगळवारी त्या दोघांची जामीनावर सुटका झाली. या प्रकरणानंतर काल बुधवारी बायणातील झुआरी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या उमा पाटील आणि तिच्या शिवम या पुत्राला शासकीय नोकरी प्रकरणात फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी चिंचवाडा-चिंबल येथील रश्मी चोपडेकर या महिलेने या प्रकरणी पोलीस तक्रार केलेली आहे. उमा पाटील हिने चोपडेकर हिच्या मुलाला पोलीस खात्यात कॉन्स्टेबलची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. आपल्या मुलाला नोकरी मिळेल या आशेने चोपडेकर हिने उमा पाटील हिला सहा लाख रुपये दिले होते. परंतु नोकरी मिळालीच नाही व पैसेही परत करण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने चोपडेकर व तिच्या मुलाला मनस्ताप सहन करावा लागला. पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याचे दिसून आल्याने अखेर चोपडेकर यांनी त्या माता पुत्राविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर चौकशीअंती पोलिसांनी त्यांना अटक केली. वास्कोत चहाट्यावर आलेले मागच्या पाच दिवसांतील हे दुसरे प्रकरण आहे. वास्को पोलीस या माता व पुत्राच्या व्यवहारांबाबत अधिक तपास करीत आहेत.