छंद जोपासण्याच्या नादात झाला वैज्ञानिक
50 वर्षांपासून मोजत होता हिमवृष्टीचे प्रमाण
वैज्ञानिक होण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. परंतु प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. परंतु एक व्यक्ती केवळ स्वत:चा छंद जोपासत वैज्ञानिक झाला आहे. या इसमाने जमविलेली माहिती पाहून जगभरातील वैज्ञानिक दंग झाले आहेत. हा इसम मागील 50 वर्षांपासून हिमवृष्टीचे प्रमाण नोंदवित होता. आता त्याच्याकडे हवामानातील बदलापासून रोपांवरील हिमवृष्टीच्या प्रभावाविषयी देखील माहिती आहे.
कोलोराडो येथील बिली बर्र एक सामान्य व्यक्ती होती. त्यांनी छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या, लायब्रेरीत काम केले, लॅबमध्ये अकौटंट म्हणूनही त्यांनी नोकरी केली. काही दिवस एका कंपनीत बिझनेस मॅनेजर म्हणूनही काम केले. परंतु त्यांना आकडेवारी जमविण्याचा छंद होता. घरी असताना ते शाळेसमोरून जाणाऱ्या मुलांची संख्या मोजायचे. एकेदिवशी पर्वताच्या दिशेने जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मग ते रॉकी पर्वताच्या दिशेने चालत सुटले, 12,600 फूट उंचीच्या या पर्वतावर होणारी हिमवृष्टी ते एका छोट्या एनालॉग उपकरणाद्वारे नोंदवू लागले. हवामानातील बदलही ते नोंदवून घेत आणि प्रत्येक गोष्ट ते स्वत:च्या नोटबुकमध्ये नमूद करत.
तापमानबदलाविषयी दिली माहिती
काही दिवसांमध्येच बिली यांनी तेथे स्वत:ची झोपडी तयार केली आणि एका वैज्ञानिकाप्रमाणे डाटा जमविण्यास सुरुवात केली. कुठल्याही वैज्ञानिक प्रयोगासाठी त्यांनी हे केले नव्हते. ते एक साधू असल्याचे लोकांचा समज होता. परंतु एक दिवस अमेरिकेतील एका वैज्ञानिकाची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी बिली यांच्याविषयी माहिती मिळविली आणि ते अवाक्च झाले. 73 वर्षीय बिली यांच्याकडे हवामानाविषयी असलेला डाटा जगातील कुठल्याही वैज्ञानिकाकडे नसल्याचे समोर आले. पश्चिम अमेरिका कोरडे का होतेय, तापमानात कशाप्रकारे बदल होतोय, जंगली फुलांच्या कालावधीविषयी त्यांनी माहिती दिली. प्राण्यांच्या हालचालींविषयी अनोखी माहिती त्यांनी पुरविली.
जगाला काहीतरी देऊ इच्छितो
मी सामाजिक राहिलो नसलो तरीही इतरांची पर्वा करण्याची इच्छा नेहमीच होती. लोकांना मदत करू इच्छित होतो. याचमुळे मी शांततेत काम करता येईल अशा ठिकाणाचा शोध घेत होतो. काही दिवस काम केल्यावर मला मार्ग सापडला, असे बर्र सांगतात. आज रॉकी माउंटेन बायोलॉजिकल लेबोरट्री बर्र यांच्यामुळेच आहे. येथूनच अमेरिका आणि जगातील अन्य भागांमध्ये हवामान कसे बदलणार हे कळते. रोपांवर हवामानाचा प्रभाव कशाप्रकारे पडतोय हे देखील समजते. माझी सर्व सामग्री खराब होतेय, परंतु त्याचद्वारे मी माझे काम सुरू ठेवू इच्छितो. मी जगाला काहीतरी देऊन जाऊ इच्छितो असे उद्गार बर्र यांनी काढले आहेत.