एचडीबी’चा आयपीओ 25 जूनला होणार खुला
12,500 कोटी रुपये उभारणार : एचडीएफसी बँकेची सहकारी कंपनी
वृत्तसंस्था/ मुंबई
एचडीएफसी बँकेची सहकारी कंपनी एचडीबी फायनॅन्शीयलचा आयपीओ 25 जून रोजी बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. याअंतर्गत कंपनी 12 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम उभी करणार आहे, अशी माहिती आहे.
एचडीबी फायनॅन्शीयल सर्व्हिसेस यांचा आयपीओ 25 जूनला खुला होऊन 27 जूनला बंद होणार आहे. समभागाची इशु किंमत 700-740 रुपये प्रति समभाग ठेवण्यात आली आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी 24 जूनला आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. आयपीओअंतर्गत कंपनी 10 हजार कोटी रुपये ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तक एचडीएफसी बँक यांच्याकडून उभारले जाणार आहेत. तर 2500 कोटी रुपये ताज्या इक्विटी समभागांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.
काय करणार रक्कमेचे..
एचडीएफसी बँकेची एचडीबी फायनॅन्शीयल सर्व्हिसेसमध्ये 94.36 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. एचडीबी फायनॅन्शीयल ही बिगर बँकिंग वित्त कंपनी एचडीएफसी बँकेची सहकारी कंपनी आहे. उभारलेल्या रक्कमेचा वापर कंपनी टायर 1 शहरात भांडवलासाठी करणार आहे. या रक्कमेचा वापर
अतिरीक्त कर्जाची मागणी पूर्ण
करण्यासाठीही केला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
2 जुलैला सुचीबद्ध शक्य
आयपीओपैकी 50 टक्के हिस्सेदारी संस्थात्मक गुंतवणूकदार तर 35 टक्के रिटेल गुंतवणूकदार व 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकादारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कंपनीचा समभाग बीएसई व एनएसईवर 2 जुलै रोजी सुचीबद्ध होण्याची शक्यता सांगितली जात आहे.