‘एचडीबी’चा आयपीओ जून अखेरीस
वृत्तसंस्था/ मुंबई
एचडीएफसी बँकेच्या नॉन-बँकिंग उपकंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ जूनच्या अखेरीस येऊ शकतो. या संदर्भातील माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील सर्वात मोठ्या एनबीएफसीला आयपीओसाठी सेबीकडूनही मान्यता मिळाली आहे. एचडीबी फायनान्शियल आयपीओद्वारे 12,500 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये नवीन इश्यू आणि विक्रीसाठी ऑफर दोन्ही समाविष्ट आहेत. एचडीबी फायनान्शियलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला होता. कंपनीचे लक्ष्य 25 ते 27 जून दरम्यान इश्यू उघडण्याचे आहे
कंपनीने यूडीआरएचपी (अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे आणि काही दिवसांत रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर करण्याची योजना आहे. त्यानंतर, कंपनी 24 जून रोजी अँकर भाग जमा करेल. सध्या, कंपनी 25 जून ते 27 जून दरम्यान सार्वजनिक सबक्रिप्शनसाठी हा इश्यू उघडण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
एचडीएफसी बँकेचा कंपनीतील हिस्सा 94.64 टक्के आहे. एचडीबी व्यतिरिक्त, ए-वन स्टील्स इंडिया लिमिटेड, शांती गोल्ड इंटरनॅशनल लिमिटेड, डॉर्फ-केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड आणि श्रीजी शिपिंग ग्लोबल लिमिटेड यांनाही आयपीओसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. एचडीबी फायनान्शियलच्या बोर्डाने 8 महिन्यांपूर्वी आयपीओ योजनेला मान्यता दिली.