एचसीएलचा नफा 5 टक्क्यांनी वाढला
आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीमधील आकडेवारी : महसूलात 5 टक्क्यांनी वाढ
मुंबई :
आयटी कंपनी एचसीएल टेकने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत (तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वर्ष 2025) वार्षिक आधारावर एकत्रित निव्वळ नफ्यात 5.54 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4,350 कोटी रुपये होता. तर मागील तिमाहीत तो 4,235 कोटी रुपये होता. म्हणजेच, कंपनीचा निव्वळ नफा तिमाही आधारावर 8.40 टक्क्यांनी वाढला आहे.
18 रुपयांचा लाभांश
एचसीएल टेकच्या संचालक मंडळाने समभागधारकांना प्रति समभाग 18 रुपयांचा अंतरिम लाभांश देखील मंजूर केला आहे. कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डर्सना नफ्यातील काही हिस्सा देतात, ज्याला लाभांश म्हणतात.
29,890 कोटींचा महसूल
तिसऱ्या तिमाहीत एचसीएल टेकचा महसूल वर्षाच्या आधारावर 5.07 टक्क्यांनी वाढून 29,890 कोटी झाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 28,446 कोटी रुपये होता. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 28,862 कोटी रुपये होता. म्हणजेच, दुसऱ्या तिमाहीत आर्थिक वर्ष 2025 च्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.
समभाग 24 टक्के वाढला
एचसीएल टेकच्या समभागांनी एका वर्षात 24.35 टक्के परतावा दिला आहे. निकालांपूर्वी, एचसीएलचा समभाग 1.01 टक्क्यांनी घसरून 1,975 रुपयांवर बंद झाला. एचसीएल टेकच्या शेअर्सनी गेल्या 5 दिवसांत 0.35 टक्के, 1 महिन्यात 0.31 टक्के, 6 महिन्यात 25.83 टक्के आणि एका वर्षात 24.35 टक्के परतावा दिला आहे.