एचसीएल सीईओंना 176 कोटीचे वेतन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एचसीएल टेक्नॉलॉजीचे सीईओ सी. विजयकुमार यांना वेतनापायी 176 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी आयटी सेवा देणाऱ्या कंपनीमध्ये सर्वाधिक वेतन प्राप्त करणारे ते झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत सी. विजयकुमार यांच्या वेतनामध्ये 67 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी वेतनाच्या तुलनेमध्ये विजयकुमार यांचे वेतन 291 पट अधिक आहे. 30 जून अखेरपर्यंत एचसीएल टेकमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाख 27 हजार 181 इतकी होती.
कोणत्या सीईओंना किती वेतन
देशातील आघाडीवरच्या आयटीसेवा कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनाच्याबाबतीत तुलना केल्यास टीसीएसचे सीईओ के. कृतीवासन यांना आर्थिक वर्ष 2026 मध्ये 28 कोटी रुपये वेतन मिळाले आहे. विजयकुमार यांच्या तुलनेत हे वेतन 6 पट कमी आहे. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना 82.6 कोटी रुपये वेतन मिळाले आहे. टेक महिंद्राचे मोहीत जोशी यांना अंदाजे 67 कोटी रुपये वेतन मिळाले आहे. त्याचप्रमाणे विप्रोचे सीईओ श्रीनिवास पल्लीया यांना 49 कोटी रुपये वेतन मिळाले आहे.