फेरीवाला समिती निवडीत दिलीप पवार, किरण गवळी विजयी ! निवडीनंतर विजयी उमेदवारांचा जल्लोष
कोल्हापूर शहरामध्ये पथविक्रेता समितीच्या सर्वसाधारण गटामधील दोन जागांसाठी दिलीप पवार, किरण गवळी विजयी झाले आहेत. यामध्ये दिलीप पवार यांना 1655 तर किरण गवळी यांना 1513 मते मिळाली. तर दत्ता चौगुले, इंद्रजीत शेट्टी हे पराभूत झाले. यामध्ये चौगुले 61 तर इंद्रजीत शेट्टी यांना 586 मते मिळाली.
कोल्हापूर शहर पथविक्रेता समिती सदस्यांची नियुक्ती अनेकदिवसांपासून रखडली होती. मतदान कोणी घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर महापालिका प्रशासनानेच निवडणूक घ्यावी अशा सुचना शासना दिल्या. महापालिका प्रशासनाकडून फेरीवाला समिती सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु केली. फेरीवाला समितीमध्ये एकूण 20 नियुक्त करावे लागतात. यामध्ये 12 सदस्यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, सामाजीक संस्था, संघटना यांच्या सदस्यांचा समावेश आहे. उर्वरीत 8 सदस्य फेरीवाल्यांच्या मधून निवडणूकीने घ्यावयाचे होते. या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 1 जागेवर अर्जच दाखल झाला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. उर्वरीत दोन जागांसाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या अंतिम दिवशी यामध्ये कोणीही माघार घेतली नाही. फेरीवाल्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. बुधवारी 2 जागांसाठी मतदान पार पडले. 5630 मतदानापैकी 2140 मतदारांनी मतदान केले होते. गुरुवारी केएमसी कॉलेज येथे मतमोजणी करण्यात आली. यामध्ये नोटासाठी 11 तर 24 मते बाद झाली. यामध्ये दिलीप पवार व किरण गवळी विजयी झाले. मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर सर्वच विजयी उमेदवारांना निवडीची प्रमाणपत्रे देण्यात आली.
हि निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया प्रशासक के.मंजूलक्ष्मी, निवडणूक निर्णय अधिकारी उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय पाटील, नोडल ऑफिसर विलास साळुंखे, सुधाकर चल्लावाड, एनयुएलएमचे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, विजय वणकुद्रे यांनी कामकाज पाहिले
सात सदस्य
समितीच्या अनु:जाती महिला मधून सरोज राजेंद्र कांबळे, अल्पसंख्याक महिला मधून मुमताज अब्दुल बागवान, इतर मागास प्रवर्ग मधून नंदकुमार आनंदराव वळंजू, सर्वसाधारण महिला मधून शेवताबाई वसंतराव जाधव, दिव्यांग मधून अमर रहंदोमल छत्री या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर दिलीप पवार, किरण गवळी हे सर्वसाधारण गटातून निवडून आले. फेरीवाले संघटनेच्या एकूण 20 जागांपैकी 12 जागा यापूर्वीच नियुक्त करण्यात आल्या आहेत. 8 जागांपैकी 1 जागेसाठी अर्जच प्राप्त झाला नसल्याने हि जागा रिक्त राहिली.