कॅम्प पोलीस स्थानकातील हवालदाराचा राहत्या घरी झोपेतच मृत्यू
पोलीस दलात हळहळ : रविवारी पहाटे संतिबस्तवाड येथे घटना उघडकीस
बेळगाव : कॅम्प पोलीस स्थानकात सेवा बजावणाऱ्या एका हवालदाराचा झोपेतच मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली असून संतिबस्तवाड या त्याच्या मूळगावी ही घटना घडली आहे. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मल्लसर्ज निंगाप्पा अंकलगी (वय 44) मूळचा राहणार मच्छेदार गल्ली, संतिबस्तवाड, सध्या राहणार सिटी पोलीस लाईन असे त्याचे नाव असून हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शनिवार दि. 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचा बंदोबस्त आटोपून मल्लसर्ज संतिबस्तवाड येथील आपल्या घरी गेले. रात्री जेवण करून झोपले होते. मध्यरात्री 2 वाजता त्रास होत असल्याचे सांगून घराच्या हॉलमध्ये झोपले. पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी त्यांना उठवले. त्यावेळी ते उठलेच नाहीत. त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही म्हणून तातडीने त्यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.