For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोने तस्करीत 38 कोटींचा हवाला व्यवहार

10:54 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
सोने तस्करीत 38 कोटींचा हवाला व्यवहार
Advertisement

रान्या रावला सहकार्य केल्याची आरोपी साहिल जैनची कबुली : डीआरआयची माहिती

Advertisement

बेंगळूर : अभिनेत्री रान्या रावच्या सोने तस्करी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला सोने व्यापारी साहिल सकारीया जैन याने 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे 49.6 किलो सोने विक्री करण्यासाठी साहाय्य केले आहे. तसेच हवालामार्फत 38.4 कोटी रुपये दुबईला पाठविण्यासही साहिलने रान्या रावला मदत केल्याचे तपासातून समोर आले असल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सांगितले आहे.

सोने तस्करी प्रकरणात सोने विक्री करण्यासाठी आणि हवालामार्फत व्यवहार करण्यात साहिल जैन याने रान्या रावला सहकार्य केले असल्याचे डीआरआयने विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड अर्जात म्हटले आहे. 26 मार्च रोजी जैन याला अटक करण्यात आल्यानंतर 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यंदाच्या जानेवारीत 11.56 कोटी रु. किमतीचे 14 किलो 568 ग्रॅम सोने विक्रीसाठी रान्या रावला सहकार्य केले. हवाला व्यवहारातील 11.01 कोटी रु. दुबईला पाठविण्यास सहकार्य केले. फेब्रुवारीत 11.81 कोटी रु. किमतीचे 13 किलो 433 ग्रॅम सोने विक्रीसाठी साहिलने सहकार्य केले.

Advertisement

त्याच महिन्यात दुबईला 11.25 कोटी रु. हवालामार्फत आणि 55.81 लाख रु. रान्या रावला पाठविण्यास मदत केल्याचेही त्याने कबुली दिल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दुबईहून सोने तस्करी करताना अभिनेत्री रान्या रावला 3 मार्च रोजी बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. यावेळी डीआरआय अधिकाऱ्यांनी तिच्याजवळून 14.7 किला सोने जप्त केले होते. दुसऱ्याच दिवशी तिच्या निवासस्थानावर छापा टाकून 2.67 कोटी रु. व दोन किलो सोने जप्त करण्यात आले होते.

कमिशन घेतल्याचीही जैन याच्याकडून कबुली

सोने तस्करी प्रकरणात साहिल जैन हा तिसरा आरोपी आहे. त्याने रान्या रावला 40 कोटी रुपये किमतीचे 49.6 किलो सोने विक्रीसाठी व दुबईला हवालामार्फत 38.4 कोटी रुपये पैसे हस्तांतरित करण्यासाठी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंगळूरमधील अभिनेत्रीला 1,73,61,787 रु. हस्तांतरित करण्यात आले. प्रत्येक व्यवहाराच्या मोबदल्यात 55,000 रु. कमिशन घेतल्याचे त्याने चौकशीवेळी कबुली दिली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात तस्करीत त्याची भूमिका असल्याचे उघड झाली आहे, असे डीआरआयने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.