For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाने हाहाकार; जनजीवन ठप्प, तीन बळी

12:20 PM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाने हाहाकार  जनजीवन ठप्प  तीन बळी
Advertisement

शेकडो वृक्ष कोसळले, नद्या, ओहोळांना पूर : झाडे पडल्याने अनेक भागात वीज खंडित,घरे, झाडे, दरडी केसळल्याने नुकसान

Advertisement

पणजी : राज्याला आषाढाच्या मुसळधार पावसाने रविवारी झोडपून काढले. शनिवारी पावसाचा जोर किंचित कमी झाला तरी रविवारी पहाटेपासूनच पावसाने संपूर्ण गोव्याला झोडपले. हवामान खात्याने सकाळीच ऑरेंज अर्लट जारी केला. दरम्यान, पावसाच्या या हैदोसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. अनेक महामार्ग पुराच्या पाण्याखाली गेले. असंख्य वृक्ष उन्मळून पडले. त्यातून कित्येक घरांची पडझड झाली. राज्यभरात वीज खांब कोसळले. कुंडई येथे अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत कोसळल्यामुळे तीन कामगार मरण पावले. एक गंभीर जखमी झाला. धुवाधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सत्तरी, सांगे, केपे, डिचोली आदी भागात पुरस्थितीमुळे सुमारे 30 नागरिकांना जवानांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढले. पावसामुळे राज्यातील मालमत्तेचे आतोनात नुकसान झाले. आज सोमवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्याने सर्व शाळाना सुट्टी जाहीर केली आहे.

गोव्यात रविवारी मुसळधार पावसाने हैदोस घातला. त्यामुळे राज्यातील बहुतांश नद्यांची पात्रे पुराच्या पाण्याने भरून गेली. कित्येक नद्यांचे पाणी हे पात्राबाहेर पोहोचले आणि ते पाणी घरे, दुकांने व अन्य आस्थापनांमध्ये घुसले. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर थोडा ओसरला. हवामान खात्याने सकाळी मुसळधार पाऊस सुरु होताच ऑरेंज अर्लट जारी केला. मुसळधार पावसाने राजधानी पणजीतही हैदोस माजविला. पणजी बसस्थानकासह अनेक भाग पाण्याखाली गेले.

Advertisement

ऑरेंज अर्लट जारी, आजही मुसळधार शक्य

हवामान खात्याने सोमवारसाठी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. शनिवारी सकाळी 8.30 ते रविवारी सकाळी 8.30 या दरम्यान राज्यात पडलेल्या एकंदरीत सरकारी पाऊस 2 इंच एवढा आहे. त्यामुळे राज्यात एकंदर आतापर्यंत पडलेल्या पावसाने इंचाचे अर्धशतक गाठले. यंदाच्या मौसमात पडलेला पाऊस हा सरासरीपेक्षा 6.2 इंच जादा आहे. यामध्ये रविवारी पडलेल्या पावसाचा समावेश आहे. शनिवारी रात्री उशिराने सुऊ झालेला पाऊस रात्रभर तसेच रविवारी दुपारपर्यंत राज्यभरात सातत्याने कोसळत राहिला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लोकांनी पावसाचे रौद्रऊप पाहून बाहेर न पडता घरीच राहणे पसंत केले. मात्र काहीजणांनी स्वत:च्या जीवाची पर्व न करता, सरकारने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन धबधबे गाठण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्यावर आपत्ती ओढविली.

कुंडईत भिंत कोसळून तीन कामगार जागीच ठार

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फोंडा तालुक्याला जबरदस्त तडाखा बसला. रौद्ररूप धारण केलेल्या पावसामुळे कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या कंपनीची संरक्षक भिंत सदर्न इंजिनिअरिंगच्या शेडवर कोसळल्याने 3 कामगार डिगाऱ्याखाली सापडून जागीच ठार झाले, तर एकटा किरकोळ जखमांवर बचावला. ही घटना रविवारी दुपारी 3.30 वा. सुमारास घडली. मृतांमधील दोघे बिहारमधील तर एकटा ओडिशा राज्यातील आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती

गोव्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला. त्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागली. अनेक ठिकाणी जिल्हा तसेच ग्रामीण रस्त्यांवरही पाणी आल्याने वाहने अडकून पडली. त्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. एकंदरीत राज्यभरात अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. हवामान खात्याने 9 ते 11 जुलै या कालावधीतही यलो अलर्ट जारी केला आहे.

जुने गोवे येथे जणू ढगफुटी झाल्याची भिती

जुने गोवे येथे शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत धो धो पाऊस कोसळला. तेथील लोकांमध्ये जणू ढगफुटी झाल्यासारखी भिती निर्माण झाली. तेथे सुमारे सहा तासात तब्बल साडेसहा इंच पाऊस पडला. पणजी ते फोंडा महामार्ग जुने गोवे, खोर्ली, धुळापी येथे पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली. परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने बरीच नुकसानी झाली. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जुने गोवे, खोर्ली परिसरातील दुकाने, हॉटेल्स, मार्केट परिसर दिवसभर बंद होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी पाच तासांमध्ये जुने गोवेमध्ये 6.5 इंच, गोवा बायोडायव्हीर्सिटी बोर्ड परिसरात 5 इंच, पणजी, 5 इंच, काणकोण 2.5 इंच, तर म्हापसा मध्ये केवळ 1 इंच पावसाची नोंद झाली.

पाली येथे धबधब्यावर अडकला 25 जणांचा गट

सत्तरी तालुक्यातील पाली येथे सुमारे 25 जण धबधब्यावर गेले असताना पाणी वाढल्याने तेथेच अडकून पडले. स्थानिक लोकांनी त्यांना धबधब्यावर जाण्यास मज्जाव केला असतानाही हा गट धोकादायक ठिकाणी गेला आणि स्वत:वर संकट आढेवून घेतले. मात्र त्यांना अग्निशामक दलाचे जवान, पोलिसांनी तसेच अनेक स्थानिकांनी सुखऊप बाहेर काढले.

पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला

काणकोण, केपे, सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणचे लहान पूल पाण्याखाली गेले असून काही गावातील वाहतूक संपर्क तुटला आहे. आगामी दोन - तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून 40 ते 50 किमी तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही खात्याने बजावले आहे.

आज बारावीपर्यंत विद्यालयांना सुट्टी, कॉलेजला नाही

रविवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवार दि. 8 जुलै रोजी बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खाते आणि शिक्षण खाते यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे. पावसाने राज्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले असून शाळकरी मुलांना तसेच शिक्षकांना शाळेत येण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता गृहीत धऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण खाते संचालक शैलेश झिगंडे यांनी सुट्टीचे परिपत्रक जारी केले असून विद्यार्थ्यांनी घरीच राहावे आणि धोक्याच्या ठिकाणी जावू नये, असा सल्ला परिपत्रकातून देण्यात आला आहे. मात्र आज 8 जुलै रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी नाही. त्यांनी हजर राहावे असा खुलासा उच्च शिक्षण संचालनालयाने केला आहे.

धबधब्यांवर जाण्यास आठवड्याभराची बंदी

मुसळधार पावसाने राज्यातील धबधबे ओसंडून वाहू लागल्यामुळे तेथे जाण्यास सरकारने एक आठवडाभर बंदी घातली आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पाऊस ओसरल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. धबधब्यात बुडून अनेकांचे जीव गेल्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यात 60 वीज खांब कोसळले, मोठी नुकसानी

जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे राज्यातील विविध ठिकाणी मिळून एकूण 60 वीज खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती वीज खात्याने दिली आहे. त्यामुळे खात्याला मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी दिली आहे. सत्तरी, सांगे, उसगांव भागात जास्त प्रमाणात वीज खांब पडले असून सोमवारी सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने तसेच वीज खांब कोसळल्याने वीज वाहिन्या तुटल्या आहेत. त्या पूर्ववत जोडून युद्धपातळीवर वीज पुरवठा चालू करण्याचे काम सुऊ आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.