समदृष्टीने मन स्थिर झालेल्यांनी जन्माला येऊन जे मिळवायचे ते मिळवले
भगवंत म्हणाले, माणसाच्या मनात भेदभाव असल्यानेच हा आपला तो परका असा विचार तो करतो आणि त्यानुसार आपल्या माणसाला त्याची लायकी नसली तरी झुकते माप देतो व परक्या मनुष्याला त्याची लायकी असूनसुद्धा डावलतो. हे सर्व समोर दिसणारी दुनिया खरी आहे आणि मी कर्ता आहे ह्या अज्ञानामुळे झालेल्या गैरसमजुतीतून घडत असते. विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि कुकर्म करणारे लोक या सर्वांकडे सारख्याच नजरेने पाहतो. आत्मज्ञानी माणसाला सगळ्यांच्यातलं ब्रह्माचं अस्तित्व ठळकपणे दिसत असतं. त्यामुळे त्याला समोरची वस्तु किंवा प्राणी वेगवेगळे दिसत नसून सर्वत्र फक्त परब्रह्माचीच उपस्थिती आहे हे जाणवत असतं. साहजिकच त्याला हे चिलट, हा हत्ती, चांगली, वाईट कर्मे करणारी माणसे किंवा हा आपला मुलगा आणि तो परका असे न वाटून सगळे सारखेच वाटतात. ज्यांना आत्मज्ञान झालेले नाही ते हे जग खरे वाटते. प्रत्यक्षात हे एक स्वप्न असते. स्वप्नातल्या गोष्टी जाग आल्यावर नाहीशा झाल्या तरी मनुष्य त्याबद्दल सुख वा दु:ख मानत नाही. आत्मज्ञान झालेला योगी आध्यात्मिकदृष्ट्या सदैव जागाच असल्याने त्याला हे जग खरे असल्याचे स्वप्न पडत नाही.
आपल्यामुळे जगाचे व्यवहार चालले आहेत असा अहंकार सामान्य मनुष्याला वाटत असल्याने तो समोरच्या वस्तूत, माणसात फरक करत असतो. त्याचा अहंकार नाहीसा झाल्याने तो भेदभाव करत नाही. अनेक संतांनी दिनदुबळ्यांना कोणताही भेदभाव न करता मदत केलेली आहे. दामाजीपंतानी दुष्काळाच्यावेळी गोरगरीब जनता उपाशी मरते आहे हे बघितल्यावर होणाऱ्या शिक्षेची पर्वा न करता सरकारी धान्याची गोदामे उघडून त्यांना धान्यवाटप केले होते, एकनाथांनी तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला गंगा पाजली होती. हे सगळे त्यांच्यातील ईश्वरी अस्तित्व पाहूनच ते करू शकले. नुसते अस्तित्व नाही तर समोरील सर्व वस्तू त्यांना ईश्वराचेच दर्शन घडवत होत्या. मग त्यांच्या मनात भेदभाव येईलच कसा? भगवंत पुढे म्हणतात, समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झालेले असते त्यांनी जन्माला येऊन जे मिळवायचे असते ते मिळवले असे म्हणता येईल कारण सर्वांच्या ठिकाणी सारख्याच प्रमाणात असलेल्या ब्रह्माचे ठिकाणी ते स्थिर झालेले असतात.
इथे चि जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी । निर्दोष सम जे ब्रम्ह झाले तेथे चि ते स्थिर ।।19 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, समदृष्टीचे तत्व असे आहे की, सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत ह्याची साधकाला संपूर्ण जाणीव असते. माहित असणे आणि जाणीव असणे ह्यात फरक येतो. उदाहरणार्थ उन्हाळ्यात सूर्य तेजाने तळपत असल्याने कडक ऊन पडते हे सगळ्यांना माहित असले तरी जे उन्हात फिरतात त्यांना त्याची धग जाणवते. त्याप्रमाणे सर्वत्र परब्रह्म भरून राहिले आहे हे सर्वांना माहित असते परंतु साधकांना त्याची प्रत्यक्ष जाणीव होते.