पणजी शहरावर कॅसिनोंची मालकी झाली आहे काय?
मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल : वाहतूक कोंडीवर नाराजी व्यक्त
पणजी : पणजीतील दयानंद बांदोडकर मार्गावर संध्याकाळनंतर कॅसिनोंमुळे रोज होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीवर उघड नाराजी व्यक्त करुन गोवा उच्च न्यायालयाने शहरात पार्किंगसाठी जागाच नसल्याचे नमूद केले. एवढेच नव्हे, तर शहरावर कॅसिनोंची मालकी झाली आहे का? असा सवालही केला आहे. पणजीत वाहतुकीसाठी आणखी शिस्त लागण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे. राजधानी पणजीतील वाहतूक व्यवस्था सुधारली असली तरी वर्दळीचा असलेल्या दयानंद बांदोडकर मार्गावर संध्याकाळनंतर कॅसिनेंमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.
पणजी वाहतूक व्यवस्थेवर दाखल केलेल्या स्वेच्छा याचिकेवर खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. अमित जामसांडेकर यांच्यासमोर सुनावणी सुऊ आहे. सांता मोनिका जेटीवरील प्रवाशांना रस्ता ओलांडताना त्रास होत असल्याने आणि अन्य गैरसोयींना आळा घालण्यासाठी आयुषी क्रूझ प्रा. ली. ने याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सरकारला अनेक निर्देश देताना, नायजेल दा कोस्टा फ्रेझ याना ‘अमिकस क्युरी“ म्हणून नेमणूक केली आहे. सुनावणीवेळी, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाल्यामुळे शहरातील बहुतांश वाहतूक सुरळीत झाल्याचे नमूद केले. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आराखडा सहा महिन्यांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यातील किती कामे पूर्ण झाली आणि किती बाकी आहेत, याचा आढावा न्यायालयापुढे मांडण्याचे त्यांनी मान्य केले.