माणुसकी जपणारी शहापूरची हट्टीहोळी गल्ली
जात-धर्माच्या भिंती ओलांडणारी गल्ली : आकाराने लहान असली तरी विचारांनी मोठी
अमित कोळेकर, बेळगाव
बेळगाव शहराच्या दक्षिण भागात वसलेला शहापूर परिसर हा केवळ भौगोलिक रचनेमुळेच नव्हे, तर त्याने जपलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांमुळेही विशेष ओळख निर्माण करणारा भाग आहे. पाणथळ भूभागामुळे मुबलक पाणीसंपदा लाभलेल्या या परिसरात सांगली संस्थानाच्या काळापासून नागरी वसती विकसित होत गेली. काळाच्या ओघात शहापूरमधील अनेक गल्ल्या इतिहासाच्या साक्षीदार ठरल्या. मात्र, विविध जाती, धर्म आणि संस्कृती यांना एका नात्यात बांधून ठेवणारी हट्टीहोळी गल्ली आजही सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास आणि सांस्कृतिक समृद्धीचे जिवंत उदाहरण म्हणून उभी आहे. आकाराने लहान असली तरी विचारांनी मोठी असलेली ही गल्ली शहापूरच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
पाण्याची नैसर्गिक देणगी अन् शहापूरचा विकास
बेळगाव शहराच्या दक्षिण भागात वसलेला शहापूर परिसर पाणथळ भूभागामुळे नैसर्गिक जलसंपदेने समृद्ध म्हणून ओळखला जातो. या भागात मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने पूर्वी सांगली संस्थानाच्यावतीने शहापूर येथे वसाहत स्थापन करण्यात आली. उन्हाळा कितीही तीव्र असला तरी प्रत्येक घरात विहीर असल्यामुळे येथे पाण्याची कमतरता कधीही जाणवली नाही. या नैसर्गिक देणगीमुळेच काळाच्या ओघात शहापूरमधील नागरी वस्ती झपाट्याने वाढत गेली. विविध गल्ल्या विकसित झाल्या आणि परिसराचा सर्वांगीण विकास झाला. याच विकसित होत गेलेल्या शहापूर परिसरात सामाजिक सलोखा, धार्मिक सहअस्तित्व आणि सांस्कृतिक परंपरा जपणारी हट्टीहोळी गल्ली एक आगळेवेगळे उदाहरण म्हणून पुढे आली. शहापूर उपनगरातील कोरे गल्ली आणि कचेरी गल्ली यांना जोडणारी गल्ली म्हणून हट्टीहोळी गल्ली ओळखली जाते. आकाराने लहान असली तरी सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी ही गल्ली आहे. या गल्लीत वास्तव्यास असलेल्या हट्टीहोळी कुटुंबाच्या नावावरून या गल्लीस ‘हट्टीहोळी गल्ली’ हे नाव रुढ झाले आहे.
सामाजिक एकोपा आणि सामंजस्य
हट्टीहोळी गल्लीत मराठा, लिंगायत, देवांग तसेच इतर समाजाचे नागरिक अनेक पिढ्यांपासून एकत्र, एका कुटुंबाप्रमाणे वास्तव्यास आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणारी ही गल्ली शहापूर परिसरात सामाजिक सलोखा आणि आपुलकीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या सामाजिक एकोप्याबरोबरच येथील जीवनशैलीही व्यवसायप्रधान आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक असून कोणी डॉक्टर, कोणी सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे, कोणी प्रगतशील शेतकरी तर कोणी साडी व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत सन्मानाने जीवन जगत आहेत. सध्याची पिढी नोकरी व व्यवसायासाठी उच्चशिक्षण घेऊन देश-विदेशात कार्यरत असली, तरी कौटुंबिक प्रसंगांच्या वेळी आपल्या घराची ओढ त्यांना आपोआप खेचून आणते.
श्री बनशंकरी मातेचे मंदिर व मंगल कार्यालय
हट्टीहोळी गल्लीत देवांग समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री बनशंकरी मातेचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना सुमारे दोनशे वर्षांपूर्वी झाली असल्याचे सांगितले जाते. अलीकडेच मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून श्री बनशंकरी देवस्थानाच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराशेजारी सर्व सुविधांनी युक्त असे मंगल कार्यालय उभारण्यात आले असून ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावर उपलब्ध आहे.
श्री दानम्मादेवी मंदिर : श्रद्धा आणि सेवा
हट्टीहोळी गल्लीत लिंगायत समाजाचे प्रसिद्ध दानम्मादेवी मंदिर व मंगल कार्यालय आहे. या मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार महात्मा फुले रोडकडे तर दक्षिणेकडील प्रवेशद्वार हट्टीहोळी गल्लीकडे आहे. हे मंदिरही जुने असून लिंगायत समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात उभारलेले भव्य मंगल कार्यालय सर्व समाजातील नागरिकांच्या शुभप्रसंगी वापरले जाते.
जात-धर्मातील सौहार्द
हट्टीहोळी गल्लीत कधीही जात, धर्म किंवा भाषेवरून वाद निर्माण झाल्याचे आढळत नाही. शेजारी-शेजारी आनंदाने राहत असल्याने एकमेकांबद्दलची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास पिढ्यान्पिढ्या कायम आहेत. त्यामुळे शहापूरमधील हट्टीहोळी गल्ली सामाजिक सौहार्दाचे आदर्श उदाहरण ठरली आहे.
मूर्तिकारांची ओळख
घरगुती गणेशमूर्तींपासून ते भव्य सार्वजनिक गणपती मूर्ती घडविणारे कुशल मूर्तिकार या गल्लीत वास्तव्यास आहेत. लाड या आडनावाने परिचित असलेल्या मूर्तिकारांच्या गणेशमूर्तींना केवळ बेळगावातच नव्हे तर बेळगावबाहेरही मोठी मागणी आहे. त्यामुळे ‘मूर्तिकारांची गल्ली’ म्हणून हट्टीहोळी गल्ली पंचक्रोशीत मानाने ओळखली जाते.
उत्सव, युवक आणि सामाजिक उपक्रम
शिवजयंती असो वा गणेशोत्सव, प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने हट्टीहोळी गल्लीतील लहान-थोर, महिला-पुरुष सारेच एकता युवक मंडळाच्या माध्यमातून एकत्र येतात. केवळ उत्सव साजरे करण्यापुरतेच नव्हे, तर सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि विविध सार्वजनिक कार्यांमधून गल्लीतील एकजूट अधिक घट्ट करण्यासाठी नागरिक सातत्याने प्रयत्नशील असतात. या सर्व उपक्रमांमध्ये युवकांचा उत्स्फूर्त, जबाबदार आणि नेतृत्वशील सहभाग ही या गल्लीतली खरी ताकद ठरते. याच सहभागातून सामाजिक एकोपा, धार्मिक सहअस्तित्व, सांस्कृतिक परंपरा आणि परस्पर विश्वास यांचे सुंदर व सशक्त मिश्रण आकारास आले आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धागा जपणारी हट्टीहोळी गल्ली आकाराने जरी लहान असली, तरी विचारांनी, मूल्यांनी आणि संस्कृतीने अत्यंत समृद्ध आहे. म्हणूनच शहापूरमधील ही गल्ली आजही आदर्श नागरी जीवनाचा वस्तूपाठ ठरत असून, एकोप्याच्या परंपरेचे जिवंत प्रतीक म्हणून अभिमानाने उभी आहे.
‘माझं वेणुग्राम’मालिकेतून उलगडतील बेळगावच्या ऐतिहासिक गल्ल्यांच्या कहाण्या
‘तरुण भारत’ची विशेष मालिका ‘माझं वेणुग्राम’द्वारे बेळगावातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या गल्ल्यांच्या अज्ञात आणि रंजक कहाण्या उलगडल्या जात आहेत. या मालिकेतून अशा अनेक गल्ल्यांची ओळख अधोरेखित होत आहे, ज्या आजही परंपरा, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपत, बेळगावची ओळख समृद्ध करत आहेत. ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनेलवर तसेच दैनिक आवृत्तीमध्ये. ‘माझं वेणुग्राम’ ही मालिका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी प्रसिद्ध होत आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.