51 पवित्र नद्यांच्या जलाने हत्तरसंग कुडल येथे विश्वरूप शिवलिंगास अभिषेक; विश्वशांती व शेतकरी कल्याणासाठी विशेष धार्मिक विधी
ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी 15 मार्च ते 15 ऑक्टोबर या कालावधीत देशातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन 51 पवित्र नद्या आणि 51 कुंडतीर्थांचे जल संकलित केले होते. या पवित्र जलाने हत्तरसंग कुडल येथील दोन्ही मंदिरांमध्ये अभिषेक करण्यात आला.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने उद्योजक राम रेड्डी यांचा सन्मान करण्यात आला. हत्तरसंग कुडल गावात धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठ्या संधी असून, युवकांनी स्वयंरोजगार व उद्योगाकडे वळावे, असे आवाहन राम रेड्डी यांनी केले. यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करावेत, असे सांगत लवकरच शेतकऱ्यांना गोबरगॅस उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, दीपावलीनिमित्त ड्रीम फाउंडेशनच्या वतीने राम रेड्डी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना नवीन कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी कुटुंबांसोबत दीपावलीचा आनंद साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला हत्तरसंग कुडल येथील ग्रामस्थ, मंदिर समितीचे पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
