महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हातकणंगले, शिरोळमध्ये दोघांत तिसरा

05:53 PM Oct 30, 2024 IST | Radhika Patil
Hatkanangle, third of two in Shirol
Advertisement

कृष्णात चौगले/ कोल्हापूर

Advertisement

माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि उल्हास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात शिवसेना उबाठा गटाला नारळ देऊन सोमवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मफलर गळ्यात बांधला. त्यामुळे मंगळवारी डॉ. मिणचेकर यांनी हातकणंगलेतून आणि उल्हास पाटील यांनी शिरोळ मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही माजी आमदारांची मतदारसंघात आजही लक्षणीय ताकद असल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीला आता दोघांचा सामना करावा लागणार आहे. तसेच भविष्यात उबाठा शिवसेनेला या दोन मतदारसंघात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागणार आहे.

Advertisement

गतविधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांचा 6 हजार 770 च्या मताधिक्यांनी पराभव केला. त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यांच्या सोबतच हातमिळवणी करण्याची वेळ हातकणंगलेच नव्हे तर राज्यातील अनेक मतदारसंघातील नेत्यांवर आली. पण कोरोना महामारीनंतर राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार अस्तिवात आले. परिणामी डॉ. मिणचेकर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचा पर्याय निर्माण झाल्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत असताना त्यांची साथ सोडायची नाही, ही विचारधारा जोपासून मिणचेकर उबाठा शिवसेनेसोबतच राहिले. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर हातकणंगलेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण या मतदारसंघात राजू आवळे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसलाच देण्यात आला. त्यामुळे अखेर डॉ. मिणचेकर यांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडला. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राजू आवळे, गतनिवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची 44 हजार 562 मते मिळवलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने यांच्यासमोर डॉ. मिणचेकर यांचे आव्हान निर्माण झाले आहे.

शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीची स्थापना करून त्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण जागा वाटपामध्ये राजर्षी शाहू आघाडीला महायुतीच्या सहयोगी पक्षाचा दर्जा देऊन शिरोळ मतदारसंघातून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील उमेदवार आहेत. तर तिसऱ्या आघाडीतून उल्हास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे प्रमुख तिरंगी सामना रंगणार आहे.

शिरोळ मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला समजला जातो. तरीही गतविधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे उमेदवार अनिल उर्फ सावकार मादनाईक यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. निवडणूक लोकसभेची असो अथवा विधानसभेची. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचा इतिहास पाहता मतांचे जातीय ध्रुवीकरण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उल्हास पाटील यांना उमेदवारी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उल्हास पाटील हे पुर्वाश्रमीचे शिवसेना उबाठा गटाचे असल्यामुळे ही मते देखील पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. परिणामी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसमोर तिसऱ्या आघाडीच्या उल्हास पाटील यांचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

उर्वरित मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची ताकद कोणाला ?

तिसऱ्या आघाडीने शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. पण जिह्यातील उर्वरित आठ मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची ताकद कोणाला द्यायची हे अद्याप ठरलेले नसून लवकरच त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

उबाठा गटातील शिवसैनिकांची भूमिका ठरणार निर्णायक

माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि उल्हास पाटील यांनी तिसऱ्या आघाडीतून विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली असली तरी हे दोघेही पुर्वाश्रमीचे उबाठा शिवसेनेचे शिलेदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उबाठा गटातील सर्वसामान्य शिवसैनिक कोणती भूमिका घेतात ? याच्यावर या मतदारसंघातील कौल अवलंबून आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article