हातकणंगले लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट! प्रकाश आवाडे मैदानात; १६ तारखेला अर्ज दाखल करणार
हातकणंगले मतदारसंघात नविन ट्विस्ट आला असून आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. आपल्या ताराराणी पक्षाकडून आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी त्यांचे पुत्र राहूल आवाडे यांनी जाहीर केली. प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीमुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात असून विशेषता धैर्यशील माने यांच्या मतांवर यांचा मोठा परिणाम होणार आहे.
लोकसभेच्या निवडणूकासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये धामधूमीचे वातावरण असताना इचलकरंजीचे विद्यमान अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज मोठा बाँब टाकला. आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेमध्ये आपले चिरंजिव राहूल आवाडे यांच्यासह त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राहूल आवाडे यांनी आपल्या वडिलांची उमेदवारी जाहीर केली.
पहा VIDEO>>>हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नविन ट्विस्ट! आमदार प्रकाश आवाडे लढवणार निवडणूक
राहूल आवाडे यांनी ताराराणी पक्षाकडून प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्याची राजकिय परिस्थिती पहाता माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पुर्वी राहूल आवाडे यांचे नाव चर्चेत होते. पण या मतदारसंघामध्ये माझा चेहरा लोकांना जास्त परिचित असल्याने कमी कालावधीमध्ये मी लोकांपर्यंत पोहोचू शकेन." असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, "मी तारारारी पक्षाकडून 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे. काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना मी राजीनामा देऊन भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदासाठी मी निवडूण आलावर त्यांच्याच बाजूने मतदान करणार. राहुल आवाडे यांनी सर्व्हे केल्यानंतर मी लोकसभा लढावी असा आग्रह करण्यात आला आहे." असे त्यांनी म्हटलं आहे.
आपली उमेदवारी ही भाजप पुरस्कृत आहे या प्रश्नावर बोलताना त्यांनी आपल्याला भाजपने कोणत्याही प्रकारचा अर्ज कऱण्यास सांगितलं नसल्याचं म्हटले आहे. तसेच मी बंडखोरीही केलेली नसून महायुतीच्या उमेदवारामध्ये मी खोडा घालत नसल्याच त्यांनी स्पष्ट केलं.