मी कडकनाथसारखे घोटाळे केले नाहीत...आणि पायही धरले नाहीत; राजू शेट्टी यांचा सदाभाऊंना खोचक टोला
मी कडकनाथ सारखे घोटाळे करून अथवा कोणाचेही पाय धरून संसदेत जाण्याचा प्रयत्न करत नाही मी स्वत:च्या हिमतीवर खासदार होण्याचा प्रयत्न करत असल्याची खोचक टिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी नाही तर खासदारकीसाठी लढून त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टी यांनी आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गुलाम राहीन असं लिहून दिल्याची जहरी टिका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केल्यावर त्यांच्या या टिकेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उत्तर दिलं आहे.
हातकणंगले मतदारसंघामध्ये महायुतीचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे धैर्यशील माने यांचा निसटता विजय संपादित केला. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या मतामध्ये कमालीची घसरण झाली.
त्यानंतर शिराळा येथे झालेल्या खासदार धैर्यशील माने यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टिका केली.
मी तुमचा गुलाम राहणार...
राजू शेट्टींवर टिका करताना “जो माणूस म्हणत होता की मी अपक्ष निवडणूक लढवणार....मी कोणत्याही आघाडीत जाणार नाही...मी शेतकऱ्यांसाठी लढत असून मी शेतकऱ्यांचा उमेदवार आहे. पण त्याच माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना लिहून दिलं की, मी तुमचा गुलाम राहणार फक्त मला पाठिंबा द्या...राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगायचे की आपणाला त्यांच्याविरोधात लढायचं आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते तर ते फक्त खासदारकीसाठी लढत होते.” अशी टिका सदाभाऊ खोत यांनी केली.
कडकनाथ घोटाळा आणि खासदारकी...
शक्तीपीठ विरोधात निघालेल्या आंदोलनामध्ये राजू शेट्टीसुद्धा हजरी लावली. यावेळी माध्यमांशी चर्चा करताना राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खासदार होणं काय गुन्हा नाही किंवा वाईट नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी खासदार व्हायचं असतं....मी चारवेळा लढलो पण दोन वेळा यश मिळालं. आता पुन्हा लढत राहणार आहे. कारण मला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. संसदेत जाण्याची महत्त्वकांक्षा बाळगली तर त्यात गैर नाही?” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना सदाभाऊ खोत यांच्यावर खोचक टिका करताना त्यांनी, “मी कडकनाथसारखे घोटाळे करून संसदेमध्ये जात नाही...अथवा कोणाचे पायही धरून जात नाही...मी स्वत:च्या हिमतीवर आणि सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन करून आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून संसदेत जाण्याचा प्रयत्न करतो. आता ज्यांना वाईट वाटतं त्यांनीही संसदेत जाण्याचा प्रयत्न करावा. लोक ठरवतील कोणाला संसदेत पाठवायचं”, असा टोलाही राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला आहे.