राजकिय पोळी भाजण्यासाठी काही लोकांकडून आंदोलन- खासदार धैर्यशील माने
एका बाजूला नेत्यांना गाव बंदी करतात तर दुसऱ्या बाजूला राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण आंदोलन करतायत असा टोला हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी विरोधकांना लगावला आहे. काल पेठवडगाव येथे खासदार हरवला आहे अशा प्रकारचे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने केल्यावर त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. कोल्हापुरातील पेठवडगाव येथे मराठा कार्यकर्त्यांनी खासदार धैर्यशील माने हरवले आहेत...ते कोणाला सापडले तर त्यांची तात्काळ मतदारसंघात पाठवणी करा असे आंदोलन केले होते. आंदोलक एवढ्यावरच न त्यांनी तशा आशयाचा फलक तयार करून खासदारांचा डिजीटल फलक संपुर्ण पेठवडगावात फिरवला. आंदोलकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन तक्रार दाखल केली. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.
या आंदोलनानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खासदाल माने यांनी आंदोलकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काही मंडळींकडून राजकीय ईर्षेपोटी माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. एका बाजूला जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा काही मंडळीकडून राजकीय पोळ्या भाजण्यासाठी असे आंदोलन केली जात आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावर मी देखील कटिबद्ध असून मुख्यमंत्री व केंद्र सरकारला पाठपुरावा करत आहे. तसेच यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे."असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.