For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा उमेदवारीच्या निमित्ताने शाहूवाडीकरांच्या अशा पुन्हा पल्लवीत

06:23 PM Apr 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
लोकसभा उमेदवारीच्या निमित्ताने शाहूवाडीकरांच्या अशा पुन्हा पल्लवीत
Satyajit Patil Sarudkar
Advertisement

दिवंगत खासदार उदयसिंह गायकवाड यांच्यानंतर पुन्हा शाहूवाडीचे नाव लोकसभा रणांगणात दिसणार; हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नव्या उमेदवारीने चर्चेला उधाण; महायुती, वंचित, स्वाभिमानीचे उमेदवार ठरले, मात्र महाविकास आघाडीचे अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ

संतोष कुंभार शाहूवाडी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चिती अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शेट्टी आणि वंचितकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र महाविकास आघाडीचे अजूनही चाचपणी आणि चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगल्याने शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे. नव्या राजकीय समीकरणात माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचे नाव आघाडीवर असल्याने पुन्हा एकदा खासदार उदयसिंह गायकवाड यांच्यानंतर शाहूवाडीचे नाव लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहूवाडीचे सुपुत्र असलेले दिवंगत उदयसिंह गायकवाड यांनी नेतृत्व केले होतें, शाहूवाडीचे नाव दिल्लीत घेतले जात होते. यावेळच्या राजकीय घडामोडीचे चित्र फारच वेगळं आहे. अनेक राजकीय घडामोडी घडल्याने रोज नवीन बातमी समोर येत असल्याने मतदाराबरोबरच कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. हातकणंगले मतदारसंघ यावेळी चांगलाच चर्चेत आला आहे. प्रारंभीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवारी निश्चितीचं घोंगड चांगलंच भिजत पडलं. त्यात महायुतीने बाजी मारत उमेदवारी खासदार धैर्यशील माने यांच्या गळ्यात घातली. तर एकला चलो भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेत उमेदवारी निश्चित करून भेटीगाठी करत बाजू भक्कम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

गत लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने देखील यावेळी पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा करत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुन्हा हातकणंगले मतदारसंघ चर्चेत आला आहे. या सर्व राजकीय घडामोडीत काटाजोड लढतीसाठी महाविकास आघाडीने अजूनही मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. माजी खासदार राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत येऊन मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका महाविकास आघाडीतील एका गटाची आहे. तर एकला चलो भूमिका शेट्टींनी घेतल्याने महाविकास आघाडीसमोर देखील पेच उभा आहे. मात्र नव्या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडी उमेदवार देणार असल्यामुळे पुन्हा मतदारसंघातील चर्चेचे गुऱ्हाळ पुढे सरकू लागले आहे.

Advertisement

या राजकीय घडामोडीत शाहूवाडी पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचे नाव पुढे आल्याने पुन्हा दिवंगत माजी खासदार उदयसिंह गायकवाड यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. कारण कोल्हापूर मतदारसंघातून मुळचे शाहूवाडीचे सुपुत्र उदयसिंग गायकवाड यांनी पाच वेळा नेतृत्व केले होते. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाहूवाडीतील नेत्याला उमेदवारी मिळाली तर शाहूवाडीचे नाव निवडणूक रिंगणात येणार की काय, अशी चर्चा सर्वसामान्यांत सुरू आहे.
हातकणंगले मतदारसंघात महायुती, वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारी निश्चितीचा धोरण ठरलें, मात्र महाविकास आघाडीचे घोडं अजूनही चर्चेच्या फेऱ्यातच अडकल्याने उमेदवाराची घोषणा होणार कधी आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार की पुन्हा एकदा पाठिंबाचीच मशाल दिसणार, याचीदेखील उत्सुकता लागून राहिली आहे.

Advertisement
Tags :

.