विधानपरिषदेतही द्वेष भाषण प्रतिबंधक विधेयक संमत
सभागृहात भाजपची निदर्शने चर्चेदरम्यान गदारोळ : सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप
बेळगाव : द्वेष भाषण प्रतिबंधक विधेयक-2025 विधानपरिषदेत संमत करण्यात आले. शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडून विधेयक मांडण्यात आले. यावर दिवसभरात सुमारे 5 तास चर्चा करण्यात आली. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करत सभापतींच्या आसनासमोर धरणे धरले. यावेळी गदारोळ निर्माण झाला. या गदारोळातच द्वेष भाषण प्रतिबंधक विधेयक संमत करण्यात आले. या विधेयकामुळे द्वेष पसरविणाऱ्या भाषणांवर, ते प्रसारित करणाऱ्यांवर व सोशल मीडियाद्वारे ते पसरविणाऱ्यांवर कठोर करवाई होणार आहे.
गृहमंत्री डॉ. परमेश्वर विधेयक मांडताना, अलीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध बोलले जात असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे. तसेच द्वेषपूर्ण भाषणामुळे समाजात अशांतता पसरवून त्यांना भडकविण्याची कृत्ये होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. तसेच राजकीय व जातींबाबत द्वेषपूर्ण भाषणे होत आहेत. याचे विपरित परिणाम कोणत्याप्रकारे होत आहेत, याकडे आपण पाहिले पाहिजे. द्वेषपूर्ण भाषणांद्वारे समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील जनतेला शांततापूर्ण वातावरणात जगता यावे, या उद्देशाने हा कायदा आणला जात आहे. नवा कायदा अधिक परिणामकारी आहे. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता कायद्याच्या चौकटीत आणण्याचा आपला प्रयत्न आहे. द्वेष भाषणामुळे खुनासारख्या गंभीर घटना घडल्या असून समाजात हिंसा वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारने हे विधेयक आणले आहे. या कायद्याचे पालन करणाऱ्याने कोणातीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. वृत्तपत्र असो किंवा सोशल मीडिया, कोणीही समाजातील शांतता भंग हाईल असे वृत्त प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्याद्वारे द्वेषपूर्ण वृत्त प्रसारित करण्यावरही मर्यादा येणार आहेत, असेही परमेश्वर म्हणाले.
लाज वाटली पाहिजे!
भाजप नेते बुद्धिमान असतील असे आपल्याला वाटले होते. पण माझी निराशा झाली आहे. आम्ही विधेयक का आणले आहे हे तुम्हाला समजलेच नाही, असा टोला गृहमंत्र्यांनी भाजप आमदारांना लगावला. यावर विरोधकांनी आक्षेप घेऊन राज्य सरकारवर आरोप केले. यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यामुळे संतप्त झालेल्या परमेश्वर यांनी, शांतता राखण्यासाठी आणलेल्या विधेयकाला समर्थन देण्याऐवजी तुम्ही याला विरोध करत, याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असा शब्दात संताप व्यक्त केला.
राज्यात ‘पोलीसराज’ आणणार का?
यामुळे गोंधळात भर पडली. भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात तर काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी केली. या विधेयकाच्या माध्यमातून राज्यात ‘पोलीसराज’ आणायचे आहे का?, पोलीस स्थानके ही काँग्रेसची केंद्रे आहेत का?, असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रतोद रविकुमार यांनी उपस्थित केला. यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच सभापती बसवराज होरट्टी यांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण आणले.
राजकीय हेतू नाही!
त्यानंतर डॉ.परमेश्वर यांनी द्वेष भाषण प्रतिबंधक विधेयक कर्नाटकाच्या हितासाठी असल्याचे सांगून कोणत्याही राजकीय हेतूने आणलेले नाही. यामुळे विनाकारण विरोध करू नये. याला समर्थन देऊन विधेयक संमत करण्याची विनंती केली. यावर भाजप आमदार के. एस. नवीन यांनी राज्यघटनेने आम्हाला भाषण स्वातंत्र्य दिले असून सरकारने याचे नियंत्रण आपल्याकडे ठेवण्यासाठी विधेयक आणले आहे. हे विधेयक सभागृह समितीकडे सोपवावे, अशी मागणी केली. सी. टी. रवी यांनी देखील विधेयकाला विरोध केला. हे विधेयक संविधानविरोधी आहे. विरोधक व पत्रकारांना कारागृहात डांबण्याच्या सरकारचा यामागचा उद्देश आहे. नव्या काद्यानुसार पोलिसांना अधिकार देण्यात आले असून कायद्यांतर्गत राज्यात पोलीसराज आणण्याचा डाव आहे, असा आरोप केला. यानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाल्याने सभापतींनी दुपारी 12:40 वाजता विधानपरिषदेचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब केले.
माझी सुरक्षा काढून घेतली : चेलुवरायस्वामी
पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी म्हणाले, आपण विरोधी पक्षनेते असूनही आपल्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात येते. याबाबत तक्रार दाखल केली तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट संबंधिताना संरक्षण पुरवून मला दिलेली सुरक्षा काढून घेण्यात आली. हा कोणता न्याय? राष्ट्रपती व पंतप्रधानांवरही द्वेषपूर्ण वक्तव्ये करण्यात आली. त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
किमान 15 वर्षे काँग्रेस सत्तेवर राहणार : डॉ. परमेश्वर
गृहमंत्री डॉ. परमेश्वर विधेयक मांडताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. यावेळी सी. टी. रवी यांनी तुम्ही हा कायदा आणत आहात. मात्र, हाच कायदा तुमच्यावर उलटणार असल्याचा टोमणा मारला. याला प्रत्युत्तर देताना परमेश्वर यांनी, हा कायदा आपल्यावर लागू होणार नाही. काँग्रेस अजून किमान 15 वर्षे तरी सत्तेवर राहणार असल्याचा दावा केला. यावर सी. टी. रवी यांनी शपथ घेऊन सांगतो, यापुढे तुमचे सरकार येणार नाही. 2028 तर सोडाच; आजच निवडणुका घेतल्या तरी तुमचे सरकार येणार नसल्याचा टोला लगावला.