थेट पाईपलाईनच्या यशामध्ये सर्वांचे योगदान -पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर प्रतिनिधी
काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेच्या यशाचे श्रेय हे कोणा एका व्यक्तीचे नाही. कोल्हापूरच्या सर्व जनतेचे हे यश आहे. मी पालकमंत्री असताना थेट पाईपलाईनचे पाणी जनतेला दिवाळीत मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पाणी पूजन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे ते कुणी पूजले, कधी पूजले याला महत्व नाही. योजनेअंतर्गत नियमीत पाणीपूरवठा सुरू झाला की लोकार्पणाचा कार्यक्रम घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मुश्रीफ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी तत्काळ पैसे दिल्यामुळे निधी अभावी या योजनेचे काम कधीही बंद पडले नाही. कोल्हापूरातील एका कार्यक्रमात त्यांनी ही योजना झाली नाही तर पवार यांची औलाद सांगणार नाही, असे जाहीरपणे सांगितले हेते. माजी आमदार आणि राज्य नियोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विधान भवनाच्या पायरीवर उपोषण केले होते. इतकेच नव्हे तर माजी महापौर रामभाऊ फाळके यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मी अशा अनेकांनी प्रयत्न केल्याने ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे हे सांघिक यश आहे.
लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
हसन मुश्रीफ म्हणाले, शुक्रवारी रात्री अकरा वाजता पाणी येईल अशी कल्पना जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दिली होती. मात्र आमची राजकीय भूमिका बदलली आहे. त्यामुळे काहींना वाटले असेल की आम्ही याचे श्रेय घेऊ म्हणून त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असेल. आता पाणी आले आहे हे वास्तव आहे. ते नियमीत सुरू झाले की लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा घेतला जाईल.
थेट पाईप लाईनसाठी सुरक्षा रक्षक
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापालिकेतील आढावा बैठकीत अभ्यंग स्नानाबद्दल मी बोललो आणि त्यानंतर लगेचच कुणीतरी काळम्मावाडी येथे जावून वायरी कापून तांत्रिक बिघाड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योजनेचे पाणी आल्यानंतरही काहीनी फ्लॉंज काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जाईल. यापुढे योजनेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवले जातील. ज्यामुळे भविष्यात अशा अडचणी येणार नाहीत.
योजनेत भ्रष्टाचार नाही
योजनेत भ्रष्टाचा झाला असल्याचा आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला असल्याच्या मुद्याकडे मंत्री मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता त्यांनी या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र असे कुणाला वाटत असेल तर त्याची चौकशी करू असे मुश्रीफ यांनी सांगितले.