Hasan Mushrif - Satej Patil यांची समझोता एक्सप्रेस सुसाट, राजकारणात ठरणार भारी?
राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर राजकारणाने कूस बदलली
By : संतोष पाटील
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचा राजकीय आणि वैयक्तिक याराना काल, आज आणि उद्याही दृढ राहील, असे स्पष्ट संकेत जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेतून मिळाले. पक्षीय व्यासपीठावर एकमेकांचे राजकीय शत्रू असले तरी संस्थात्मक राजकारणात एकमेकांना पूरक भूमिका घेतल्यास त्यांची ही समझोता एक्स्प्रेस विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
पक्षीय बंधनापलीकडील हे अंडरस्टँडिंग महाविकास आणि महायुतीमधील संभाव्य राजकीय समीकरणांना बदलणारे आहे. जिह्याचे 1998 पर्यंतचे राजकारण, विशेषत: संस्थात्मक पातळीवर, काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असे होते. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणात ज्याची सरशी, त्याचा गुलाल असे समीकरण होते. मात्र, राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर राजकारणाने कूस बदलली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई सुरू झाली. 2014 नंतर देशपातळीसह राज्य आणि जिह्यात भाजपची दमदार एन्ट्री झाली. दोघांमध्ये तिसरा आल्याने जिह्याचे राजकारण त्रिकोणी झाले. राजकीय जागा मिळेल तसे नेत्यांनीही अॅडजेस्टमेंट केले. 2022 नंतर जिह्याचे राजकारण पुन्हा 360 अंशांनी फिरले. शिवसेना दोन गटांत विभागली. राष्ट्रवादीचीही विभागणी झाली.
एकाचे दोन, दोनांचे तीन आणि सहा भागांत जिह्याचे राजकारण विभागले गेले. मात्र, या सर्व घडामोडींनंतर मागील 20 वर्षांत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याभोवती जिह्याचे राजकारण फिरत राहिले. जेव्हा हे दोघे एका बाजूला आले, तेव्हा पारडे फिरल्याचे दिसले. त्यांची ही एकी कधी उघडपणे, तर कधी एकमेकांना पूरक अशी राहिली.
पक्षीय व्यासपीठावर सार्वजनिक राजकारणात हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, तरी त्यांचे वैयक्तिक नुकसान होत नाही. मात्र, संस्थात्मक राजकारणात, विशेषत: गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समितीच्या राजकारणात दोघांची भूमिका एकमेकांना पूरकच राहिली आहे आणि भविष्यातही राहील, असे संकेत आहेत.
महापालिकेच्या राजकारणात मागील तीनही निवडणुकांमध्ये हे दोघे एकमेकांच्या विरोधात लढले. पण हा विरोध म्हणजे विरोधकांच्या डोळ्यात धूळफेक होती. अनेक प्रभागांत एकमेकांविरुद्ध नूरा-कुस्ती खेळत त्यांनी विरोधकांना चकवा दिला. आता सहा पक्षांचे राजकारण महाविकास आणि महायुतीच्या झेंड्याखाली सुरू आहे. मात्र, जिल्हा बँक आणि गोकुळमध्ये कितीही पक्षीय बंधने आणण्याचा प्रयत्न झाला, नेत्यांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकले, तरी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील अंतर्गत राजकारणच निकालासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
जिह्याची आर्थिक धमनी असलेल्या गोकुळ आणि जिल्हा बँकेची सत्ता हे दोघे मुरब्बी राजकारणी पक्षीय राजकारणामुळे वाटेकरी करून आपले राजकीय महत्त्व कमी करतील, असे म्हणणे आतापर्यंतच्या अनुभवावरून बालिशपणाचे ठरेल. राजकीय बुरुज कायम राखले जातील महाविकास आणि महायुती अशा दोन भागांत जिह्याच्या राजकारणाची वरवर विभागणी झाल्याचे दिसते. मात्र, संस्थात्मक राजकारणात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील दुरावा म्हणजे पाण्यावर रेघ मारण्यासारखे आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या आणि गोकुळच्या सर्वसाधारण सभांमध्ये दोघांनीही एकमेकांच्या सन्मानात तसूभरही फरक पडू दिला नाही. मागील दहा वर्षांत अनेक वेळा ज्येष्ठत्वाच्या नात्याने हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर जाहीरपणे राजकीय टीका केली, तरी सतेज पाटील यांनी प्रतिउत्तर देणे टाळले आहे. गोकुळमध्ये दोघांनी मिळून दोन हजार नव्या संस्था जोडल्या, ज्या निर्णायक ठरतात. जिल्हा बँकेचे राजकारण हसन मुश्रीफ यांना बिनविरोध करायचे आहे.
त्यासाठी सतेज पाटील यांची साथ मोलाची ठरणार आहे. जिह्याच्या राजकारणावर पकड ठेवण्यासाठी गोकुळ आणि जिल्हा बँक हे दोन महत्त्वाचे बुरूज आहेत. हे बुरूज एकहाती ताब्यात ठेवण्यासाठी पडद्यामागील घडामोडी एकमेकांना पूरक अशाच असतील. पक्षीय बंधनात राहूनही संस्थात्मक राजकारणातील दोस्ताना या दोघांनी कसा जपला, हे येत्या निवडणुकांतील निकाल सांगून जाईल.