Kolhapur Politics : हसन मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे एकत्र येणार ; राजकीय वर्तुळात खळबळ
कागलच्या राजकारणात उलथापालथ
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात युती झाली आहे. कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी होत आहे. मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्या एकत्र येण्याचे कागलसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या युतीबाबत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाल्याची चर्चा आहे.
याबैठकीत कागलमध्ये दोघांनी एकत्र येण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. मुश्रीफ आणि घाटगे यांनी विधानसभा निवडणूक एकमेकांविरोधात लढवली होती. यासाठी दोघांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष आणि टीका झाली होती. भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत घाटगे यांनी मुश्रीफ यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. आता हे दोन्ही गट कागल नगरपालिकेच्या राजकारणात एकत्र येत असल्याने एकच खळबळ उडाली.
ही युती झाली असून समरजितसिंह घाटगे यांच्या समवेत एक पत्रकार परिषद घेऊन आज, मंगळवारी खुलासा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्याने संजय मंडलिक यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र महायुती म्हणून हे तिघे एकत्र आल्यास कागल आणि मुरगूड नगरपालिकांच्या राजकारण ३६० अंशात बदलण्याची शक्यता आहे. मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्याने याचा कागलच्या राजकारणावर परिणाम होईलच, परंतु जिल्ह्याच्या राजकारणातही फरक पडणार आहे.