मंत्री Hasan Mushrif म्हणतात, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचाच..
महापौरपदांच्या वाटणीमध्ये भाजप-शिवसेनेचीच चर्चा आहे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा महापौर आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच असेल, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सोमवारी सकाळी नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
महापौरपदांच्या वाटणीमध्ये भाजप- शिवसेनेचीच चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी कुठेच दिसत नाही. या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक aिनवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आली आहे.
महापौर, स्थायी समिती सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची कासवाची चाल आहे. महायुती म्हणून सगळे एकत्र लढू. एकत्र होणार नाही तिथे वेगवेगळे लढू. पण महापौरपद आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महायुतीकडेच राहील.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, याबद्दल आश्चर्य वाटते. ज्यांनी भेट घेतली त्या व्यक्तींची पवार यांनी नावे, पत्ते, फोन नंबर तरी लिहून ठेवले असतीलच की असे म्हणत पवार यांनाच विचारायला हवे असा टोला लगावला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असा आरोप करीत राज्यभर मोर्चे काढले आहेत. या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, जे आरोप आहेत ते सिद्ध व्हावे लागतात. सत्ताधारी पक्षावर टीका, आरोप करणे विरोधी पक्षाचे कामच आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून केलेल्या मतचोरीच्या आरोपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केल्याचे नामदार मुश्रीफ यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील नवीन आर्किटेक्ट
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे, असे वक्तव्य या आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झालेले आहेत. या विषयातील त्यांचे ज्ञान प्रगल्भ झाले आहे, हे आपल्याला माहीत नव्हते.
रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो कॉंक्रिटीकरणाचा की डांबराचा यावर त्याचे दर ठरत असतात. तसेच शक्तिपीठ महामार्ग कोणावर लादायचा नाही ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
सर्किट बेंचची पाहणी करण्यासाठी जाणार नाही
सर्वजण सर्किट बेंचच्या कामाची पाहणी करत आहेत. मात्र आपण पाहणी करायला जाणार नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची कार्यक्रम आचारसंहिता वेगळी असते. कोल्हापूरचे जिल्हा न्यायालय बांधले त्यावेळी तत्कालीन उच्च न्यायाधीशांनी मला बोलावून घेवून या इमारतीचा सर्वोत्कृष्ट प्लॅन तुम्ही केलेला आहे.
सगळ्या जिह्यातून अशी मागणी पुढे आली तर त्या इमारती बांधाव्या लागतील. त्यानुसार ही जिल्हा न्यायालय इमारत ज्यावेळी बांधण्यात आली, त्यावेळी ती सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालयाची इमारत ठरली. आता तो टाईप प्लॅन म्हणून सर्व राज्यभर राबवित आहोत, असे नामदार मुश्रीफ म्हणाले.