For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

KDCC बॅंक, गोकुळनंतर आता बाजार समितीवर कागलकर, मुश्रीफांचा दबदबा वाढला

05:40 PM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
kdcc बॅंक  गोकुळनंतर आता बाजार समितीवर कागलकर  मुश्रीफांचा दबदबा वाढला
Advertisement

राजकारणात कागल तालुक्याचा दबदबा आहेच तो यानिमित्ताने अजून वाढला

Advertisement

By : प्रशांत चुयेकर

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी दस्तूरखुद्द मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ आणि आता कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षपदी मुश्रीफ गटाचे कागल तालुक्यातील सूर्यकांत पाटील यांच्या निवडीने संस्थात्मक राजकारणात कागलकरांचा दबदबा वाढल्याचे संकेत आहेत.

Advertisement

जिह्यातील सहकारातील महत्वाच्या संस्थांचा कारभार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघातील शिलेदारांच्या कॅप्टनशीपखाली सुरू असल्याचे म्हटल्यास वावगे ठऊ नये. गोकुळ दूध संघात चेअरमन पदाच्या निवडीवेळी महायुतीचा चेहरा असावा असे ठरले.

यावर तोडगा म्हणून हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मंत्री हसन मुश्रीफ यांचा जिह्यातील सहकारात दबदबा निर्माण झाला आहे. कागल तालुक्याला राजकारणाचे विद्यापीठ असे म्हटले जाते. जिह्याच्या राजकारणात कागल तालुक्याचा दबदबा आहेच तो यानिमित्ताने अजून वाढला आहे.

ग्रामीण भागात दूध संस्थाचे जाळे, सेवा सोयायट्या, पाणीपुरवठा, पतसंस्था यासह विविध संस्थाचे गावात जाळे निर्माण झालेले असते. त्यांच्याच सहकारातील प्रमुख असलेल्या जिह्यातील जिल्हा बँक, दूध उत्पादक संघ, बाजार समिती, शेतकरी संघ या प्रमुख संस्था आहेत. यामधून कार्यकर्ते घडत असतात.

जिह्यातील सहकार क्षेत्रात या संस्थेमधून पुढे आलेले नेते संचालक अध्यक्ष होत असतात. त्यामुळे गट वाढवायला सहकार क्षेञ महत्वाची भूमिका पार पाडत असतात. या संस्था निवडीत सध्या ना. मुश्रीफ यांचा शब्द अंतिम राहिल्याने वरचष्मा दिसत आहे.

पद विधानसभा मतदारसंघातदिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक यांचाही पूर्वी जिह्याच्या राजकारणावर दबदबा होता. त्यामुळे सहकारक्षेत्रासह जिल्हा परिषदसारख्या संस्थेमध्ये अध्यक्ष निवडीत त्यांची महत्वाची भूमिका असायची. त्यावेळी त्यांनीही त्यांच्या कागल मतदारसंघातील नेत्यांना महत्वाच्या संस्थेचे अध्यक्षीय निवडीत पसंदी दिली होती.

सध्या कागलचे मंत्री मुश्रीफ यांच्याकडूनही तोच धडा गिरवला जात असतो. विधानसभा निवडणूकीत बळ मिळावे, यासाठी प्रत्येक आमदार महत्वाची पदे आपल्याच मतदा संघात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

एकटे मुश्रीफ तरीही

विधानसभा निवडणुकीत जिह्यात एकटे ना. मुश्रीफ राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडूण आले आहेत. तरीही जिह्यातील आर्थिक नाड्या कागल तालुक्यातच ठेवण्यात सध्या तरी ना. मुश्रीफ यांना यश आले आहे. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीतसुध्दा जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील उमदेवार निवडूण आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे, लागणार आहेत.

कागल राजकारणाचे विद्यापीठ म्हणून...

याबाबत वैद्यकीय शिक्षण मंञी हसन मुश्रीफ यांना विचारले असता ‘कागल तालूका राजकारणाचे विद्यापीठ आहे’, त्यामुळेच महत्वाचे पद कागल तालुक्यात आहे. सभापती यांनी सकारात्मक काम करावे, चुकीच्या गोष्टीवर कठोर रहावे, असे सांगत कागलच्या राजकारणावर अधिक बोलण्याचे टाळले.

शेतकरी संघावरही कागलकरच

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी स्वत: मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी त्यांचा मुलगा नविद मुश्रीफ, तर आता बाजार समिती निवडीत बाचणी (ता.कागल) येथील सूर्यकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी संघातही नुकतेच मूरगूड (ता. कागल)s येथील प्रविणसिंह पाटील होते.

Advertisement
Tags :

.