हरियाणा थंडर्सकडे पीडब्ल्यूएलचे विजेतेपद
दिल्ली दंगल वॉरियर्सला उपविजेतेपद
वृत्तसंस्था / नोएडा
रविवारी रात्री नोएडा इनडोअर स्टेडियमवर दिल्ली दंगल वॉरियर्सविरुद्ध झालेल्या अत्यंत रोमांचक आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात हरियाणा थंडर्सने प्रो रेसलिंग लीगचे (पीडब्ल्यूएल 2026) विजेतेपद पटकावले. आठ सामन्यानंतर गुणसंख्या 4-4 अशी बरोबरीत असताना, सर्व काही महिलांच्या 62 किलो वजनी गटातील अंतिम लढतीवर अवलंबून होते. पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या इरिना कोलियाडेन्कोने दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या प्रभावी तांत्रिक श्रेष्ठत्वामुळे हरियाणा थंडर्सने 5-4 असा नाट्यामय विजय मिळवला आणि पीडब्ल्यूएलचे विजेतेपद पटकावले.
इतिहासातील अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यांपैकी एकाची सांगता झाली. हरियाणा थंडर्सला पीडब्ल्यूएलच्या ट्रॉफीसह 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले तर उपविजेत्या दिल्ली दंगल वॉरियर्सला 75 लाख रुपये मिळाले. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये, दिल्ली दंगल वॉरियर्सच्या तुरान बायरामोव्हला 57 किलो पुरुषांच्या गटात 7 पैकी 7 सामने जिंकल्याबद्दल आणि पीडब्ल्यूएलमध्ये एकूण 59 गुण मिळवल्याबद्दल 2.5 लाख रुपयांचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट‘ पुरस्कार मिळाला, तर पंजाब रॉयल्सचा चंदरमोहन स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू ठरला. नेहा सांगवानला (हरियाणा थंडर्स) अंतिम लढत शेवटच्या सामन्यापर्यंत जिवंत ठेवल्याबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच‘ पुरस्कार मिळाला, तर रौनकला (दिल्ली दंगल वॉरियर्स) पुरुषांच्या 125 किलो गटातील प्रभावी कामगिरीसाठी ‘फायटर ऑफ द मॅच‘ पुरस्कार मिळाला. 57 किलो पुरुषांच्या गटातील दमदार कामगिरीसाठी अक्षय ढेरेला (हरियाणा थंडरर्स) ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच‘ पुरस्कार मिळाला.
चॅम्पियनशिपच्या लढतीची सुरुवात दिल्लीने केली. 74 किलो पुरुषांच्या गटात अपराजित तुरान बायरामोव्हने पहिला गुण मिळवला. त्याने सुरुवातीलाच आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि 8-1 असा विजय मिळवला. हरियाणाने 76 किलो महिलांच्या गटात तात्काळ प्रत्युत्तर दिले, जिथे यू-20 विश्वविजेत्या काजल धोचकने युरोपियन चॅम्पियन अनास्तासिया अल्पीयेवाचा 3-1 असा पराभव करून लढत बरोबरीत आणला. 65 किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या लढतीत सामन्याची गती पुन्हा एकदा बदलली. दिल्लीचा कर्णधार सुजीत कालकलने एक जबरदस्त शेवटचा डाव खेळत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तुमूर ओचिर तुल्गाला 8-6 ने पराभूत केले. हरियाणाने आपली स्टार खेळाडू आणि अनेक वेळच्या विश्वविजेत्या युई सुसाकीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले, जिने सारिकावर तांत्रिक सरसतेच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला.
86 किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या लढतीत दिल्लीने पुन्हा एकदा आघाडी घेतली, जेव्हा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता वफाईपूर हादी बख्तियारने अशिरोव अशरफवर 11-0 ने मात केली. त्यानंतर हरियाणाने अक्षय डेरेच्या माध्यमातून जोरदार पुनरागमन केले, ज्याने 57 किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या लढतीत दिल्लीच्या अमित कुमारला तांत्रिक श्रेष्ठत्वावर पराभूत केले. त्यानंतर हेवीवेट गटातील लढत निर्णायक ठरली, ज्यात रोनकने प्रभावी कामगिरी करत अनिरुद्ध गुलिचाला 12-2 ने पराभूत केले आणि दिल्लीला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. हरियाणाच्या नेहा सांगवानने 57 किलो वजनी गटाच्या महिलांच्या लढतीत अंजलीला चितपट करून अंतिम सामना रोमांचक ठेवला आणि स्कोअर पुन्हा एकदा 4-4 असा बरोबरीत आणला. चॅम्पियनशिपचा निकाल दोलायमान असताना, इरिना कोलियाडेन्कोने निर्णायक 62 किलो वजनी गटाच्या महिलांच्या लढतीत आपल्या अनुभवाचा आणि संयमाचा वापर करत अंजलीला सततच्या टर्न-अँड एक्सपोजर सिक्वेन्सद्वारे चितपट केले आणि 16-0 च्या तांत्रिक श्रेष्ठत्वाच्या विजयासह हरियाणा थंडर्सला विजेतेपद मिळवून दिले. या विजयानंतर हरियाणाच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली. हरियाणा थंडरच्या विजेतेपदाने एका अविस्मरणीय पीडब्ल्यूएल -2026 हंगामाचा समारोप झाला, जो नाट्यामयता, गुणवत्ता आणि प्रत्येक अथनि आपल्या लौकिकाला साजेशा जेतेपदाच्या लढतीसाठी ओळखला जाईल.