हरियाणातील कौलामुळे स्थिरतेला बळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, भारताच्या विश्वासार्हतेची जगभरात प्रशंसा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणातील जनतेने सलग तीनवेळा भारतीय जनता पक्षाचे सरकार आणले आहे. या कौलामुळे मतदारांना राजकीय स्थिरता हवी असते, हा संदेश मिळाला आहे. राजकीय स्थैर्य असल्याशिवाय विकासाला वेग प्राप्त होत नाही, हे मर्म लोकांनी जाणल्याने त्यांचा कल स्थिर सरकार स्थापन करण्याकडे असून ही बाब महत्वाची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
ते सोमवारी एका वृत्तसंस्थेच्या जागतिक कार्यक्रमात भाषण करीत होते. भारताची विश्वासार्हता जगात कशी सुस्थापित झाली आहे, याचे उदाहरणे त्यांनी त्यांच्या भाषणात दिली. कोरोना उद्रेकाच्या काळात भारतात विविध देशांना लसीचा पुरवठा केला. त्यामुळे भारत हा अडचणीच्या वेळेला साहाय्य करणारा मित्र आहे, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. इतरही अनेक मुद्द्यांवर भारताने विश्वसमुदायाला विविध प्रकारे साहाय्य केले आहे, अशीही मांडणी त्यांनी भाषणात केली.
गृहित धरु नये
भारत इतर देशांशी आपले संबंध परस्पर विश्वास आणि प्रामाणिकतेच्या आधारावर स्थापित करतो. आम्हाला कोणीही गृहित धरावे अशी आता परिस्थिती नाही. त्यामुळे भारताच्या प्रगतीची कोणालाही असूया वाटत नाही. उलट भारताचा विकास पाहून जगाला आनंद होत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
गुलामीमुळे खुंटला विकास
प्राचीन काळी भारत ही एक आर्थिक महाशक्ती होती. तथापि, वारंवार आक्रमण करणाऱ्या परकीकांनी भारतावर गुलामी लादली. परिणामी, औद्योगिक क्रांतीचा लाभ भारत उठवू शकला नाही. पारतंत्र्याशी संघर्ष करण्यातच त्याची शक्ती खर्च झाली. आता परिस्थितीत परिवर्तन झाले आहे. आता आम्ही कोणाचे गुलाम राहिलेलो नाही. त्यामुळे आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचे युग अवतरले आहे. या युगाचा लाभ करुन घेण्यासाठी भारताने कौशल्यविकास आणि पायाभूत सुविधा या दोन महत्वाच्या बाबींवर भर दिला आहे. कौशल्यवान युवक आणि पायाभूत सुविधा ही भारताची वैशिष्ट्यो म्हणून ओळखली जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यावर लक्ष
गतकाळात काय झाले यात गुंतून पडण्यापेक्षा आजचा भारत हा भविष्यवेधी आणि सकारात्मक बनला आहे. लोकांच्या मानसिकतेत झालेले हे परिवर्तन आता स्पष्ट दिसू लागले आहे. नव्या मनोभूमिकेतून आम्ही आमच्या ध्येयांचा पाठपुरावा करीत आहोत. 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र बनविणे हे आमचे ध्येय असून आम्ही वेगाने त्याच्या पूर्तीकडे वाटचाल करीत आहोत. आज आमचा विकास दर जगात सर्वात अधिक आहे, हे महत्वाचे मुद्दे त्यांनी विशद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता जगाचा आधार
जगाचे वर्तमान आणि भविष्य कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. भारतही हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या मार्गावर वेगाने अग्रेसर होत आहे. भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा दुहेरी लाभ आहे. तरुणांची संख्या अधिक असल्याने भारत ‘तरुण देशां’पैकी एक आहे. त्यामुळे नव्या युगातील तंत्रज्ञान आणि मानसिकता स्वीकारण्यासाठी तो उत्सुक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘एआय’ म्हणजे काय ?
जगासाठी एआय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटिलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असा आहे. आम्हीही हा अर्थ स्वीकारतोच, पण त्याचबरोबर आमच्यासाठी एआय याचा अर्थ ‘अॅस्पिरेशनल इंडिया’ किंवा महत्वाकांक्षी भारत असाही आहे. अशा प्रकारे हा आमच्यासाठी दुहेरी लाभाचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.