बंगालला नमवून हरियाणा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / बडोदा
पार्थ वत्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर येथे झालेल्या 2024-25 च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात हरियाणाने बंगालचा 72 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या विजयामुळे हरियाणा संघाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे.
या सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकून हरियाणाला प्रथम फलंदाजी दिली. हरियाणाने 50 षटकात 9 बाद 298 धावा जमविल्या. यानंतर बंगालचा डाव 226 धावांत आटोपला. बंगालच्या डावामध्ये पार्थ वत्सने 77 चेंडूत 6 चौकारांसह 62, निशांत सिंधूने 67 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 64 तर सुमितकुमारने 32 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 41 धावा झळकविल्या. बंगालच्या मोहम्मद शमीने 3 गडी तर मुकेशकुमारने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बंगालच्या डावामध्ये अभिषेक पोरेलने 78 चेंडूत 6 चौकारांसह 57 धावा जमविताना सुदीप कुमार घरमी समवेत सलामीच्या गड्यासाठी 70 धावांची भागिदारी केली. घरामीने 39 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 36 धावा केल्या. दरम्यान हरियाणाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने बंगालचे गडी बाद केले. बंगालची मधली फळी कोलमडली. मुजुमदारने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 36 तर करणलालने 30 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा केल्या. हरियाणाच्या पार्थ वत्सने 3 गडी बाद केले. बंगालचा डाव 44 षटकात 226 धावांत आटोपला. आता या स्पर्धेत हरियाणाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना गुजरातबरोबर बडोदा येथे 12 जानेवारीला खेळविला जाईल.
राजस्थान विजयी
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात राजस्थानने तामिळनाडूचा 19 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात राजस्थानच्या अभिजित तोमरने 111 धावांची शतकी खेळी केली. तर अमनसिंग शेखावतने 3 गडी बाद केले. या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली. राजस्थानचा डाव 267 धावांत आटोपला. अभिजितने 4 षटकार आणि 12 चौकारांसह 125 चेंडूत 111 तर कर्णधार महिपाल लोमरोरने 49 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 60 धावा जमविल्या. अभिजित आणि लोमरोर यांनी 160 धावांची शतकी भागिदारी केली. त्यानंतर राजस्थानने तामिळनाडूला 248 धावांत गुंडाळले. यष्टीरक्षक जगदीशनने 52 चेंडूत 10 चौकारांसह 65, विजय शंकरने 69 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 49 धावा केल्या. राजस्थानतर्फे अमनसिंग शेखावत, अनिकेत चौधरी आणि अजयसिंग यांनी प्रभावी गोलंदाजी केली. आता राजस्थान आणि विदर्भ यांच्यात बडोदा येथे 12 जानेवारीला उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.